

बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त नैऋत्य रेल्वेने 1 ते 8 जुलैपर्यंत हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करुन दिली होती. या सेवेला वारकरी व विठ्ठलभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला. रोज 600 प्रवासी हुबळी ते पंढरपूर प्रवास करत होते. आठवडाभरात 4,800 जणांनी हुबळी ते पंढरपूर प्रवास केला. तर आठ दिवसात बेळगाव रेल्वे स्थानकातून 2,592 प्रवाशांनी पंढरपूरला जाणे पसंद केले.
विषेश रेल्वेला 10 बोगी होत्या. त्यापैकी आठ बोगी सामान्य प्रवाशांसाठी, एक अपंगांसाठी व एक सामान वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. एका बोगीतून 72 प्रवासी प्रवास करण्याची सोय होती. पहिल्याच दिवशी बेळगाव रेल्वे स्थानकातून 284 वारकरी व भाविक पंढरपूरला रवाना झाले होते. मात्र, शनिवारी व रविवारी या पंढरपूरला जाणार्या भाविकांची संख्या वाढली होती. आठवडाभरात रेल्वेच्या सात फेर्या झाल्या. या रेल्वेमुळे बेळगावसह खानापूर तालुक्यातील वारकर्यांची गेैरसोय दूर झाली.
बेळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकर्यांसह विठ्ठलभक्तांनी गर्दी केली होती. विशेषता ज्येष्ठ मंडळींनी पंढरपूरला जाण्यासाठी या रेल्वेने प्रवास केला. पंढरपूरहून परतीची सोय असल्याने रेल्वे खात्याचे आभार मानले. ही विशेष रेल्वे 1, 2, 3, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी हुबळीतून पहाटे 5.10 वाजता निघत होती. ती पंढरपूरला दुपारी चार वाजता पोचत होती. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पंढरपूरमधून सुटून बेळगावला रात्री 12.05 वाजता तर हुबळीला पहाटे चार वाजता पोचत होती.