

बेळगाव : महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अलमट्टी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पाण्याची ही मोठी आवक लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी (दि. 19) सायंकाळी 7 वाजेपर्यंत अलमट्टी धरणातून तब्बल 70 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला. महाराष्ट्राने 30 जूनपर्यंत जलाशयात केवळ 50 टक्के पाणीसाठा ठेवण्याची विनंती केली असली, तरी सध्या धरणात 55.53 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे, जो अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अलमट्टी जलाशयातून 50 हजार क्यूसेक इतका विसर्ग सुरू होता; मात्र पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पुरामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत गेल्याने सायंकाळपर्यंत तो 70 हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला. महाराष्ट्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, राधानगरी, दूधगंगा, वारणा यासह पश्चिम घाटातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, पावसाचा जोर अद्याप कायम आहे. यामुळे कृष्णा नदीला मिळणार्या उपनद्या दुथडी भरून वाहत असून, अलमट्टीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
अलमट्टी धरणाची कमाल पाणीसाठवण क्षमता 519.60 मीटर असून, सध्या पाण्याची पातळी 515.55 मीटरपर्यंत पोहोचली आहे. जलाशयात एकूण 68.343 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या 55.53 टक्के आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत जलाशयात पाण्याची आवक 78,250 क्युसेक इतकी होती. आवक आणखी वाढल्यास आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग अजून वाढवण्यात येईल, असे संकेत संबंधित अधिकार्यांनी दिले आहेत.
जून महिन्यातच जलाशय 55 टक्क्यांहून अधिक भरल्याने आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्याच्या दृष्टीने हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जुलै महिन्यापासून जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे कर्नाटक जलसंपत्ती विकास महामंडळाच्या (केबीजेएनएल) अधिकार्यांनी स्पष्ट केले.
सध्या तात्काळ पूरस्थितीचा कोणताही गंभीर धोका नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी व पशुधनासह कोणीही नदीच्या दिशेने जाऊ नये तसेच नदीपात्रात उतरण्याचे धाडस करू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सूचना आणि इशारे देण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार ए. डी. अमरवाडगी यांनी दिली. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
जलाशयाच्या उजव्या बाजूला असलेल्या अलमट्टी वीजनिर्मिती केंद्रातून सध्या 42,500 क्यूसेक पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. यामुळे केंद्रातील सर्व सहाही संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, येथून 225 मेगावॅट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती कर्नाटक वीज महामंडळ लिमिटेडच्या (केपीसीएल) अधिकार्यांनी दिली. वाढलेल्या पाण्यामुळे वीजनिर्मितीलाही हातभार लागला आहे.