Lok Sabha Election 2024 : कल्याण कर्नाटकात कुणाचे ‘कल्याण’? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : कल्याण कर्नाटकात कुणाचे ‘कल्याण’?

गुरय्या रे स्वामी

उत्तर कर्नाटक : कर्नाटक राज्याच्या उत्तरेस असलेल्या कल्याण कर्नाटक (पूर्वीचे हैदराबाद कर्नाटक) प्रांतात पाच लोकसभा मतदार संघांचा समावेश असून, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने या पाचही जागा जिंकल्या होत्या. परंतु, 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उदय पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची राजकीय कसोटी पणाला लागणार आहे.

मुंबई कर्नाटक आणि हैदराबाद कर्नाटक हे उत्तर कर्नाटकचे दोन भाग. चार वर्षांपूर्वी या दोन्ही प्रांताची नावे अनुक्रमे कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक अशी करण्यात आली. किनारपट्टी कर्नाटकसह एकूण 14 जागा उत्तर कर्नाटकात येतात. या 14 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. 2019 च्या निवडणुकीत या चौदाही जागा भाजपने जिंकल्या होत्या; पण यंदा स्थिती वेगळी दिसते. कारण 2023 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर कर्नाटकात आणि त्यातही हैदराबाद कर्नाटकात काँग्रेसने विधानसभेच्या 41 पैकी 30 जागा जिंकल्या आहेत.

बळ्ळारीमधून विधानसभेच्या सर्व पाच जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील नऊ जागांपैकी सात जागा भाजपने जिंकल्या असून, बिदर जिल्ह्यातील सहापैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या असून, भाजपने इथे चार जागा जिंकल्या आहेत. रायचूर जिल्ह्यातील नऊपैकी पाच जागा काँग्रेसने, तर दोन जागा भाजप व दोन जागांवर निजदने विजय मिळवला आहे. कोप्पळ जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. यादगीर जिल्ह्यातील चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.
विशेष म्हणजे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या सर्व पाच जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, यंदाची राजकीय स्थिती वेगळी असून भाजपला येथून जिंकण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहे, असे दिसते. ठिकठिकाणी बंडखोरी व पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. बंडखोरांना शांत करणे भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. कल्याण कर्नाटक हा काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखला जात होता. परंतु, अनेक मतदार संघात भाजपने मुसंडी मारत काँग्रेस पक्षाला आव्हान दिले.

मल्लिकार्जुन खर्गे यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे. विधानसभेत काँग्रेस पक्षाने विजय मिळवला तसा विजय आता लोकसभा निवडणुकीत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. गुलबर्गामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डमणी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत असून त्यांची लढत भाजपचे खासदार डॉ. उमेश जाधव यांच्याशी होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे भाजपच्या रडारवर आहेत. त्यामुळे खर्गे यांच्या समर्थकाना येथे सर्व शक्ती पणास लावावी लागणार आहे. डॉ. उमेश जाधव यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी असून, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत आहेत.

बिदर लोकसभा मतदार संघात भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यावर औरादचे आमदार माजी मंत्री प्रभू चव्हाण, आ. शरणू सलगर यांनी नाराजी दर्शविली आहे. काँग्रेस पक्षातर्फे प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांचे पुत्र सागर खंड्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा समाजाचे दोन लाख मतदार असूनही मराठा समाजाला उमेदवारी कोणत्याही पक्षाने दिली नाही. जर मराठा समाजातर्फे स्वतंत्र उमेदवार उभा राहिला, तर त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बळ्ळारी लोकसभा मतदार संघ हा नेहमीच हायव्होल्टेज मतदार संघ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. श्रीमती सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये भाजपाच्या सुषमा स्वराज यांच्याविरोधात निवडणूक लढवून जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 पर्यंत इथे भाजपचे प्राबल्य होते. परंतु, 2023 विधानसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे बी. श्रीरामलू निवडणूक लढवीत असून, त्यांची लढत ई. तुकाराम यांच्याशी होत आहे. ही अटीतटीची लढत असून, कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कोप्पळ लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार करडी संगण्णा यांना उमेदवारी डावलल्याने भाजपमध्ये फूट पडली आहे. संगण्णाऐवजी भाजपने डॉ. बसवराज कॅटर या नवख्या उमेदवारास तिकीट दिले आहे. त्यांची लढत काँग्रेसचे राजशेखर हिटनाळ यांच्याशी होत आहे. 2019 मध्ये थोड्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

रायचूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षातर्फे निवृत्त आयएएस अधिकारी कुमार नाईक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून राजा अमरेश्वर निवडणूक लढवणार की उमदवार बदलणार, ही चर्चा सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कल्याण कर्नाटकसह कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकून आणण्याचे आव्हान आहे. काँग्रेससाठी हा कसोटीचा काळ आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर काँग्रेसने अधिक भार ठेवल्याने आगामी काळात कल्याण कर्नाटकात कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच समजेल.

Back to top button