

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी स्थितीतही मिरचीचे पीक भरघोस आले आहे. पण, व्यापार्यांनी दर पाडल्याने संतप्त शेतकर्यांनी ब्याडगी (जि. हावेरी) एपीएमसी कार्यालयावर दगडफेक करुन साहित्याची जाळपोळ केली. सरकारी वाहनेही त्यांनी सोडली नाहीत. आग आटोक्यात आणण्यासाठी आलेला अग्निशामक बंबही शेतकर्यांनी पेटवून दिला. सोमवारी (दि. 11) सायंकाळी ही घटना घडली.
हावेरी जिल्ह्यासह शेजारी जिल्हे आणि इतर नजीकच्या राज्यांत मिरचीचे पीक घेणारे शेतकरी मालासह ब्याडगी एपीएमसीत येतात. यंदा पावसाअभावी दुष्काळ असतानाही बहुतेक ठिकाणी मिरचीचे पीक चांगले आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्याडगी मिरची बाजारपेठेत विक्रमी आवक होत आहे. पण, व्यापार्यांकडून दर पाडण्यात येत असल्याने शेतकर्यांनी एपीएमसीसमोर ठिय्या मांडला. अधिकारी, नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचला तरी त्यांनी आंदोलनाबाबत गांभीर्याने घेतले नाही. यामुळे चिडलेल्या शेतकर्यांनी एपीएमसी कार्यालयावर दगडफेक केली. तेथील साहित्य पेटवून दिले.
सरकारी वाहनांनाही लक्ष्य बनवले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक बंब आणण्यात आला. संतप्त शेतकर्यांनी तोही पेटवून दिला. शेतकर्यांची संख्या अधिक होती. त्या मानाने पोलिस खूपच कमी होते.
पोलिसांनी दगडफेक, जाळपोळ करणार्यांचा पाठलाग केला. लाठीमार करण्यात आला. जिल्हा पोलिसप्रमुख अंशुकुमार यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांनंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले. सायंकाळनंतर परिसरात तणाव कायम होता.
काँग्रेसचे धोरण शेतकरीविरोधी आहे. त्याचाच हा परिणाम आहे. दर पाडल्याने शेतकरी चिडले. वेळीच त्यांच्या समस्या सोडवाव्यात. दर न मिळाल्याने संकटात असलेल्यांवर लाठीमार करणे योग्य नाही. भविष्यात शेतकरी विधानसौध, मुख्यमंत्र्यांच्या निवासाला लक्ष्य बनवतील.
– आर. अशोक विरोधी पक्षनेते, विधानसभा