बेळगाव : काकती येथे डिझेल टाकून नाश्ता सेंटर पेटविले | पुढारी

बेळगाव : काकती येथे डिझेल टाकून नाश्ता सेंटर पेटविले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : काकती येथे होनगा रस्त्यावरील नाश्ता सेंटर शनिवारी (दि.४) पहाटे अज्ञातांनी डिझेल टाकून पेटविल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत विविध वस्तू जळाल्याने नाश्ता सेंटर चालक नागराज वीरभद्र अमाती या गरीब व भूमिहीन तरुणाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. नाश्ता सेंटर मधील गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागराज हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी नाश्ता सेंटर बंद करून घरी गेला होता. मात्र, शनिवारी सकाळी ते नाश्ता सेंटरकडे आले असता त्यांना सेंटर जाळल्याचे दिसून आले. सेंटरच्या आतमध्ये झाडूने डिझेल शिंपडून आग लावण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शेजारी अर्धवट जळालेल्या स्थितीत झाडू आढळून आला आहे.

या घटनेत मिक्सर, खुर्च्या, टेबल तसेच पिठाचे डबे, शेगडी व अन्य काही वस्तू जळून खाक झाल्या आहेत. जवळच असणाऱ्या गॅस सिलिंडर टाकीचा मात्र स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टाळली. संपूर्ण भांडी काळवंडली आहेत.

घटनास्थळी काकती पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे. नागराज याची गरीब परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत नागराज व त्याची आई दोघेच नाश्ता सेंटर मागील नऊ वर्षापासून चालवत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या अज्ञातांना पोलिसांनी शोधून काढून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

Back to top button