बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाच्या आडमुठेपणाला सडेतोड उत्तर देत ईर्ष्येने पेटून उठलेल्या हजारो मराठी भाषिकांनी बुधवारी, 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन फेरीत काळे कपडे आणि काळे व भगवे ध्वज घेऊन सहभागी होत कणखर मराठी अस्मिता दाखवून दिली. 'लेके रहेंगे, लेके रहेंगे बेळगाव, कारवार लेके रहेंगे' अशा गगनभेदी घोषणांतून महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचा निर्धारही व्यक्त केला.
दरवर्षी होणार्या या फेरीला परवानगी देणार नाही, अशी अन्यायी भूमिका पोलिसांनी घेतली, तर आबालवृद्धांच्या द़ृढनिश्चयासमोर प्रशासकीय दुजाभाव आणि पोलिसांची दंडेलशाही फिकी पडली. केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबले. त्या घटनेचा निषेध म्हणून सीमाभागातील मराठी भाषिक दरवर्षी 1 नोव्हेंबर हा काळा दिन पाळतात. गेल्या 67 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात तसूभरही फरक पडला नाही, याची प्रचिती बुधवारी (दि. 1) काळ्या दिनाच्या फेरीतून आली.
यंदा काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देण्यात येणार नाही, असा इशारा प्रशासनाने शेवटच्या दिवसापर्यंत दिला; पण गेल्या 67 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करणार्या मराठी माणसाने प्रशासनाच्या धमकीला न जुमानता मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होऊन फेरी यशस्वी करून दाखवली.
काळ्या दिनाच्या फेरीत संयुक्त महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार झाला. कर्नाटकी अत्याचाराविरोधात, बेळगावच्या नामांतराविरोधात, मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.