

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराविरोधात कर्नाटक सरकारने मोठी कारवाई चालवली आहे. आज (दि.३०) सकाळी भ्रष्ट आणि उत्पन्नापेक्षा जास्त माया जमवलेल्या बेळगावसह राज्यातील ९० हून अधिक शासकीय अधिकाऱ्यांवर लोकायुक्त पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली.
बेळगावात पंचायत राज खात्याचे सहाय्यक अभियंता एम. एस. बिरादार यांच्या विश्वेश्वरय्यानगर श्रद्धा अपार्टमेंट कित्तूर आणि खानापूर येथील त्यांच्या निवासस्थानामध्ये बेकायदा मालमत्ता असल्याच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी छापे टाकून तपास चालविला आहे. त्याचबरोबर गुलबर्गा येथील टाऊन प्लॅनिंग अधिकारी अप्पासाहेब कांबळे यांच्यावर देखील छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्या रामतीर्थनगर येथील निवासस्थानावर, ऑटोनगर येथील कारखान्यावर छापा टाकून अधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे. लोकायुक्तचे जिल्हा पोलीस प्रमुख हनुमंतय्या यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.