निपाणीत बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग; ५ लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही | पुढारी

निपाणीत बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग; ५ लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही

निपाणी : पुढारी वृत्तसेवा कुलूपबंद घराला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत घराचे सुमारे 5 लाख रूपयांचे नुकसान झाले. ही घटना येथील जत्राट वेस (ढोर गल्ली) येथे घडली. यावेळी घरात कोणीच नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत्राटवेस येथील रहिवाशी गणेश लहु पोळ यांच्या नातेवाईकांचा (गुरुवार) सायंकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून पोळ हे कुटुंबीयांसह कार्यक्रमास गेले होते. मात्र कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच त्यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेत रोख रक्कम, दागिने, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आणलेले साहीत्य पोळ यांच्या घरी ठेवण्यात आले होते. ते सुद्धा या घटनेत जळून खाक झाले.

दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला, दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, महेश सूर्यवंशी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे सहा उपनिरीक्षक आर. जे कुंभार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली. या घटनेची नोंद निपाणी अग्नीशामक दलात झाली आहे.

पोळ याचे सर्वसामान्य कुटुंब असून, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे घरातील सर्व साहित्य जळाल्याने पोळ कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. दरम्यान जळालेल्या साहित्याकडे पाहून घटनास्थळी पोळ यांच्या कुटूंबातील महिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यामुळे या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती. अशा उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आधार देण्याची गरज निर्माण झाली असून, लोकप्रतिनिधींसह संबंधित शासकीय खात्याने पुढाकार घेऊन मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

अग्निशमनच्या तत्परतेमुळे. ..

दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक ए.आय.रुद्रगौडर यांनी पाण्याच्या बंबासह सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले. यासाठी अग्निशमनचे प्रयत्न व तत्परता कामी आल्याने अडचणीच्या ठिकाणी असलेल्या परिसरातील इतर घरांसह होणारी आर्थिक हानीसह जीवित व वितहानी टळली. यात पोळ यांच्या घरातील असलेले दोन सिलेंडर टाक्याही बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : 

Back to top button