बेळगाव : ‘महा’मंत्र्यांना सीमाबंदी; मात्र मुंबईत कन्नड सोहळा

बेळगाव : ‘महा’मंत्र्यांना सीमाबंदी; मात्र मुंबईत कन्नड सोहळा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सीमाभागात महाराष्ट्रातील नेते आणि मंत्र्यांना बंदी घालणार्‍या कर्नाटकचे मंत्री आणि सरकारी अधिकारी मात्र महाराष्ट्रात कन्नड सोहळ्यात सहभागी झाले असून, या सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारने आर्थिक तरतूद केल्याचेही उघड झाले आहे. कर्नाटकच्या या दुटप्पी भूमिकेबाबत सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.

कर्नाटकच्या कन्नड आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने मुंबईतील कर्नाटक संघ आणि कर्नाटकच्या सीमा विकास प्राधिकरणातर्फे कुर्ला येथील राधाबाई भंडारी सभागृहात कन्नड संघटनेचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, कर्नाटकच्या संस्कृती खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी यांच्यासह सीमा विकास प्राधिकरणाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कार्यक्रमात बोलताना मंत्री तंगडगी म्हणाले, मुंबईत 45 लाख कन्नड लोक आहेत. ते आपली भाषा जोपासण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. हे कौतुकास्पद आहे. कन्नड माणूस आपली ओळख कधीही पुसू देत नाही. त्यामुळे मुंबईतील कन्नडिगांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करणार आहोत.

सभापती होरट्टी यांनी मुंबईच्या कन्नड संघटनेला पाच लाख रुपये आर्थिक निधीही जाहीर केला. यावेळी सीमाप्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सोमशेखर, सचिव प्रकाश मत्तीहळ्ळी, डॉ. सतीशकुमार होसमनी, पोलिस अधिकारी के. एम. एम. प्रसन्न, जयकृष्ण शेट्टी, कर्नाटकचे ग्रंथालय खाते, कन्नड आणि संस्कृती खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राकडून केवळ घोषणा

सीमाभागात महाराष्ट्रातील नेत्यांना, मंत्र्यांना बंदी घालण्यात आली. ती झुगारून बेळगावच्या जनतेची विचारपूस करण्याची धमक कुणीही दाखवली नाही. याउलट मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कन्नड सोहळा साजरा होतो. त्याला कर्नाटक सरकारकडून मदत केली जाते. तेथे मंत्री जातात; पण सीमाभागातील जनतेच्या जखमेवर फुंकर मारण्याच्या महाराष्ट्राकडून घोषणाच होत आल्या आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news