बेळगाव : कोण बनणार स्थायी समिती अध्यक्ष ? फैसला आज | पुढारी

बेळगाव : कोण बनणार स्थायी समिती अध्यक्ष ? फैसला आज

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 7) होणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच असून अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, अध्यक्ष कोण होणार ते निवडणुकीवेळीच कळणार आहे.

स्थायी समितीत सत्ताधारी गटाचे पाच नगरसेवक आहेत. तर विरोधकांना दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधारी गटाचेच अध्यक्ष होणार आहेत, यात शंका नाही. अध्यक्षपदासाठी रवी धोत्रे, आनंद चव्हाण, वाणी जोशी, मंगेश पवार आणि गिरीश धोंगडी यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्याशिवाय अन्य काहींनीही देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र, यापैकी कुणाला अध्यक्ष करायचे, याचा निर्णय आमदार अभय पाटील घेणार आहेत.

शुक्रवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी महापालिकेत सर्व तयारी करण्यात आली आहे. महापालिका सभागृहात खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर महापालिकेच्या कामकाजाला वेग येणार आहे. विविध विषयांवर चर्चा करणे, त्याचा ठराव करणे आदी कामांना वेग येणार आहे. त्यामुळे, अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत.

Back to top button