

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता शेखर बहुरूपी यांच्यावर बुधवारी लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. त्यांचा बेळगावातील रामतीर्थनगर येथील बंगला, मूळ रहिवासी असलेले अथणी येथील घर व ते सध्या कार्यरत असलेल्या हरपनहळ्ळी येथील त्यांच्या केबीनसह अन्य ठिकाणी एकाचवेळी छापा टाकला.
शेखर बहुरूपी यांनी उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याची तक्रार झाली होती. त्याची दखल घेऊन लोकायुक्ताने बुधवारी छापा टाकला. अथणी, बेळगाव, गोकाक, अगरी बोम्मनहळ्ळी व हरपनहळ्ळी येथे एकाच वेळी छापे पडले. लोकायुक्त पोलिस निरीक्षक रवी धर्मट्टी यांनी अथणी येथे छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. येथे 3 एकर 20 गुंठे शेती व तीन घरांची कागदपत्रे सापडली. लोकायुक्त उपअधीक्षक बी. एस. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी बेळगावसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेची चौकशी केली यामध्ये त्यांच्याकडे असलेले मोठे घबाड हाती लागले आहे. परंतु, त्याचा तपशील मिळू शकला नाही.
2019 मध्ये आलेल्या महापूर काळात अथणी तालुक्यात ट्रान्स्फॉर्मर बदलासह वीज खांब बदली करण्यासाठी आलेल्या मोठ्या निधीत हेस्कॉमच्या 20 हून अधिकार्यांनी मोठा गैरव्यवहार केला होता. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर या सर्वांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये हेस्कॉमचे विद्यमान कार्यकारी अभियंता शेखर बहुरूपी यांचाही समावेश होता. त्यांची आधी बेळगावला, त्यानंतर कारवारला बदली केली होती. आता ते हरपनहळ्ळी येथे कार्यरत आहेत.