बेळगाव : पतीचा काढला काटा स्वतः, अन् म्हणाली ‘बेपत्ता’ | पुढारी

बेळगाव : पतीचा काढला काटा स्वतः, अन् म्हणाली ‘बेपत्ता’

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : पती बेपत्ता झाल्याची फिर्याद देणार्‍या पत्नीनेच त्याचा खून केल्याच्या धक्कादायक घटनेचा एपीएमसी पोलिसांनी तीन महिन्यांनी यशस्वी छडा लावला आहे. अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने सदर महिलेने प्रियकर व त्याच्या दोघा मित्रांच्या सहायाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली असून यामध्ये एक अल्पवयीन युवक आहे.

संध्या रमेश कांबळे (वय 31), बाळू बिरंजे (36), जयमोहन ससाणे (20, तिघेही रा. आंबेडकरनगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी येथेच राहणार्‍या 17 वर्षांच्या युवकावरही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संध्या कांबळे हिचे शेजारीच राहणार्‍या बाळू बिरंजे याच्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब पती रमेश कांबळे (वय 35) याला माहिती झाल्यानंतर त्याने समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते समजून न घेता पत्नीनेच पतीच्या खुनाचा कट रचला.

बेशुद्ध करून गळा आवळला

पतीला मारण्यासाठी पत्नीने प्रियकर बाळूसह खुनाचा कट रचला. 28 मार्च 2023 रोजी पतीला द्रव पदार्थातून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. आपण सापडले जाऊ नये म्हणून रातोरात या सर्वांनी जाऊन मृतदेह चोर्ला घाटात नेऊन फेकला. मृतदेह फेकलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पती बेपत्ताची फिर्याद

पंधरा दिवस या गोष्टीची कोणीही वाच्यता केली नाही. परंतु, आपल्यावर संशय येऊ नये म्हणून पत्नीने 5 एप्रिल रोजी एपीएमसी पोलिस ठाण्यात जाऊन 28 मार्चपासून पती रमेश कांबळे बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी याची नोंद करून घेत तो बेपत्ता झाला आहे, याच दिशेने तपास सुरू केला होता.

पत्नीवर संशयावरून तपास

बेपत्ता पती मिळत नसतानाही पत्नी याबाबत फारसे काही बोलत नव्हती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय आला. यामुळे त्यांनी पत्नी संध्याला रिमांडमध्ये घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने खुनाची कबुली दिली. यानंतर यामध्ये आणखी कोण सामील होते, त्यांची नावेही सांगितली. कांबळे दांपत्याला दोन मुली आहेत. वडिलांचा खून झाल्याने व आई कारागृहात गेल्याने या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत.

मार्केट विभागाचे एसीपी नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकार्‍यांनी या प्रकरणी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सर्वांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

दोन बायकांचा दादला

या प्रकरणातील मुख्य संशयित बाळू बिरंजे याची आधी दोन लग्ने झालेली आहेत. अलीकडच्या काळात त्याचे संध्या कांबळे हिच्याशी अनैतिक संबंध होते. पती आपल्या आड येत आहे, हे संध्याने बाळू बिरंजेला सांगितल्यानंतर त्याने दोघा मित्रांना सोबत घेऊन रमेश कांबळे याचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

अल्पवयीनाने ठेवली पाळत

या खून प्रकरणात अटक केलेला चौथा संशयित अल्पवयीन युवक आहे. ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी पत्नी संध्याने पतीला आधीच बेशुद्ध केले होते. यानंतर बाळू बिरंजे व त्याचा मित्र जयमोहन ससाणे या दोघांनी जाऊन रमेश कांबळे याचा गळा आवळून खून केला. यावेळी घराकडे कोणी येऊ नये म्हणून घरासमोर पाळत ठेवण्याचे काम या अल्पवयीन युवकाने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button