बेळगाव : एका दिवसाची जत्रा नव्हे.. हा धगधगता अग्नीकुंड! | पुढारी

बेळगाव : एका दिवसाची जत्रा नव्हे.. हा धगधगता अग्नीकुंड!

बेळगाव; जितेंद्र शिंदे : सलग दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दारूण पराभव स्वीकारावा लागला. आता पराभवाचे खापर फोडण्यासाठी डोकी शोधण्यापेक्षा संघटना बळकट कशी होईल, याचा सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे म. ए. समिती म्हणजे एक दिवसाची जत्रा नव्हे तर सीमाप्रश्न सुटेपर्यंत अव्याहतपणे धगधगता अग्नीकुंड आहे, याची जाणीव प्रत्येकाला ठेवावी लागणार आहे.

2008 पासून 2018 पर्यंत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात म. ए. समितीत बंडखोरी होऊन दोन, दोन उमेदवार निवडणुकीला उभे राहात होते. त्यामुळे मतांची विभागणी राष्ट्रीय पक्षांच्या पथ्यावर पडलेली दिसून आली. 2013 सालची काँटे की टक्कर वगळता इतर वेळी म. ए. समितीचे उमेदवार तिसर्‍या स्थानावर फेकले गेले आहेत. पण, यंदा बंडखोरीचा मार संघटनेला बसत आहे, याची जाणीव ठेऊन आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात आला.

मतदारसंघात एकच उमेदवार असला तरी उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली झटापट आणि त्यातून निर्माण झालेली दरी शेवटपर्यंत दूर झाल्याचे दिसून आली नाही. नवे आणि जुने कार्यकर्ते, नेत्यांचा मेळ जमला नाही. रस्त्यावर झालेली गर्दी मतात रूपांतरीत झाली नाही. त्याचा फटका उमेदवाराला बसला आहे. बूथपातळीवर अपेक्षित काम झाले नसल्यामुळे समिती उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.
म. ए. समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पराभवाची सल आहे. चांगले वातावरण निर्माण होऊनही आपण उल्लेखनिय कामगिरी करू शकलो नाही, याचे दु:ख दिसून येते. आता या पराभवाला म. ए. समितीचेच काही नेते कारणीभूत असल्याचे उघड बोलले जात आहे. सोशल मीडियावर त्यावर जोरदार आरोप, प्रत्यारोप होत आहेत. शुक्रवारी (दि. 26) झालेल्या बैठकीतही असेच दिसून आले. त्यामुळे म. ए. समितीतून तिघांची हकालपट्टी करण्यात आली.

संघटनेत शिस्त आणण्यासाठी कारवाई होणे आवश्यक आहे. पण, या प्रक्रियेत सर्वांकडेच संशयाने बघणे आणि त्यांनी आधी केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरते. संघटनेची ताकद वाढवायची असेल तर सतत कार्यकर्त्यांत मिसळावे लागणार आहे. केवळ सीमाप्रश्न आणि मराठीचा विषय घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. तर लोकांच्या दैनंदिन समस्यांविरोधात उभे ठाकावे लागणार आहे.
निवडणुका या लढ्याचा एक भाग असला असल्या तरी निवडणुका म्हणजे साध्य नव्हे. तर सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी आपली ताकद वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास संघटनेला पुन्हा बळ येण्यास मदत होणार आहे. वर्षभरात केवळ ठराविक दिवशीच एकत्र न जमता राष्ट्रीय पक्षांच्या धर्तीवर राजकारण करावे लागेल, तरच समितीला बळकटी येण्याची शक्यता आहे.

पुनर्रचनेत हवा समतोल

तालुका म. ए. समितीची पुनर्रचना करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. ही चांगली बाब असली तरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची निवड करताना त्याची निष्ठा, ताकद तपासणे आवश्यक आहे. मतदारसंघ पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागला गेला आहे. त्यामुळे संघटनेत एकाच बाजुचे वर्चस्व न ठेवता दोन्ही बाजू समतोल राखाव्या लागणार आहेत. जुन्या लोकांनी संघटनेच्या वाढीसाठी स्वत:हून बाजुला थांबून नव्या दमाच्या नेतृत्वाला वाव देणे आवश्यक आहे..

Back to top button