कर्नाटकात देवगड हापूस मागे, जपानचा मियाझाकी सर्वात महागडा | पुढारी

कर्नाटकात देवगड हापूस मागे, जपानचा मियाझाकी सर्वात महागडा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  जगातील सर्वात महागडा आंबा सध्या कर्नाटकात दाखल झाला आहे. मियाझाकी या नावाने ओळखला जाणारा हा आंबा कोप्पळमध्ये फलोत्पादन खात्यातर्फे आयोजित मेळ्यात प्रदर्शनार्थ ठेवला आहे. एका आंब्याचा दर ४० हजार रुपये (प्रति किलो २.५ लाख) आहे.

मियाझाकी आंब्याची लागवड जपानमध्ये केली जाते. कोप्पळमध्ये या आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा फलोत्पादन खात्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रदर्शनात ठेवण्यासाठी मध्य प्रदेशातून फक्त एक आंबा आणला गेला आहे. प्रदर्शनाचे उदाटन २३ रोजी झाले. तेव्हापासून या आंब्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्रदर्शन ३१ मेपर्यंत चालणार आहे. अनेक शेतकरी या महागड्या आंब्याचे फोटो व सेल्फी घेत आहेत. प्रदर्शन सुरु झाल्यानंतर या लाल रंगाच्या या आंब्याचे फोटो वेगाने व्हायरल झाले.

प्रदर्शनात विविध प्रजातींचे आंबे ठेवण्यात आले असले तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मियाझाकीचीच चर्चा आहे. आंबा पाहून शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांची किंमत पाहून तोंडात बोटे घालत आहेत. कोप्पळ परिसरात या आंब्याची लागवड व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. या आंब्याची लागवड कशी करावी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याचे फलोत्पादन खात्याचे उपसंचालक कृष्णा उक्कुंद यांनी सांगितले.

Back to top button