कर्नाटक राज्यातील 224 आमदारांपैकी 217 जण कोट्यधीश; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत | पुढारी

कर्नाटक राज्यातील 224 आमदारांपैकी 217 जण कोट्यधीश; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात विधानसभेचे 16 वे सभागृह अस्तित्वात आले आहे. नव्याने निवडून आलेल्या 224 आमदारांपैकी 217 जणांकडे कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे. यामध्ये सर्वाधिक श्रीमंत आमदार डी. के. शिवकुमार असून त्यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती 1413 कोटी आहे. कोट्यधीश आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार 132 जण, भाजपचे 63 तर निजदचे 18 जणांचा समावेश आहे. सर्वोदय पक्ष आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे आमदारही कोट्यधीश आहेत. ही माहिती कर्नाटक इलेक्शन वॉच आणि एडीआर संस्थेच्या अहवालातून जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात सर्वाधिक श्रीमंत ठरलेल्या डी. के. शिवकुमार यांच्याकडे 1,413 कोटींची संपत्ती आहे. त्यानंतर गौरीबिदनूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार के. एच. पुट्टस्वामी गौड यांच्याकडे संपत्ती आहे. त्यांच्याकडे 1,267 कोटींची संपत्ती आहे. त्याखालोखाल प्रियांककृष्ण यांचा तिसरा क्रमांक असून त्यांच्याकडे 1,156 कोटी संपत्ती आहे.

सर्वात कमी संपत्ती सुळ्या मतदारसंघातील आमदार भागिरथी मुरुळी यांच्याकडे आहे. केवळ 28 लाखांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले अहो. कृष्णराज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. एस. श्रीवत्स यांच्याकडे 48 लाख संपत्ती आहे. मुधोळ येथील काँग्रेसचे आमदार रामाप्पा तिम्मापूर यांच्याकडे 58 लाख संपत्ती आहे. हे तीन आमदार राज्यातील गरीब आमदार म्हणून ओळखले जात आहेत. तर उर्वरित आमदारांची संपत्ती कोटीच्या घरात आहे.

राजकीय पक्षनिहाय सरासरी संपत्ती पाहिल्यास काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराची सरासरी संपत्ती 67,51 कोटी आहे. भाजप आमदारांची सरासरी संपत्ती 44.36 कोटी आणि निजद आमदारांची सरासरी संपत्ती 46.01 कोटी अहे. कल्याण राज्य प्रगती पक्षाच्या आमदाराची संपैीं 246.51 कोटी, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे आमदार यांची संपत्ती 40.15 कोटी आहे. अपक्ष आमदारांची संपत्ती 637.16 कोटी रुपयाची संपत्ती आहे.

प्रियांककृष्णावर सर्वाधिक कर्ज

नूतन आमदारांवर कर्जही अधिक प्रमाणात आहे. 224 पैकी 149 आमदारांवर एक कोटीहून अधिक कर्ज आहे. सर्वाधिक कर्ज आमदार प्रियांक कृष्ण यांच्यावर आहे. त्याखालोखाल डी. के. शिवकुमार, भैरती सुरेश हे आहेत. प्रियांक कृष्ण यांच्यावर 881 कोटी, डी. के. शिवकुमार 265 कोटी, भैरती सुरेश 114 कोटी कर्ज आहे.

80 वर्षांवरील आमदार

यावेळी 80 वर्षांहून अधिक वयाचे तीन आमदार विधानसभेत निवडून आले आहेत. 156 जण 51 ते 80 वयाचे आहेत. 64 ते 25 वयोगटातील 50 जणांचा समावेश आहे. वयोवृद्ध आमदारांची संख्या अधिक आहे.

180 आमदारांची संपत्ती 5 कोटीहून अधिक

विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या आमदारांची संख्या 217 इतकी आहे. यामध्ये 180 आमदारांची संपत्ती 5 कोटीहून अधिक आहे. 2 ते 5 कोटी पर्यंत संपत्ती असणार्‍यांची संपत्ती 31 आहे. 10 आमदारांकडे 50 लाख ते2 कोटीपर्यंतची संपत्ती आहे. 50 लाखांपेक्षा कमी संपत्ती असणार्‍या आमदारांची संख्या केवळ 2 इतकी आहे.

Back to top button