नाचणी खातेय भाव, बेळगावचे जगात नाव; अमेरिकेसह दुबई, ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात निर्यात | पुढारी

नाचणी खातेय भाव, बेळगावचे जगात नाव; अमेरिकेसह दुबई, ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात निर्यात

बेळगाव; संदीप तारिहाळकर :  काळ बदलला तसे मनुष्याचे राहणीमान बदलत गेले व पारंपरिक पिके मागे पडली. गत 30 ते 40 वर्षांत नाचणीचे पदार्थ खाणार्‍यांचे प्रमाण कमी होत गेले अन् औषधी गुणधर्म असणार्‍या नाचणीचे बाजारमूल्य कमी झाले. मात्र, गत दहा-पंधरा वर्षांत सीमाभागातील तसेच चंदगड, आजरा तालुक्यातील नाचणी एकत्र करुन प्रक्रिया करुन बेळगाव येथून थेट मुंबई बाजारपेठेत पोच झाली. औषधी गुणधर्मामुळे ही नाचणी आता विदेशात निर्यात होऊ लागली आहे. यामुळे नाचणी दर आता चौपट झाला असून, सध्या बाजारात 35 रु. किलो इतका दर मिळत आहे. शिवाय विदेशात जाणार्‍या नाचणीला तर आणखी जादा किंमत मिळून परकीय चलन मिळत आहे.

या देशात होतेय नाचणीची निर्यात

अमेरिकेसह दुबई, ओमान, ऑस्ट्रेलिया, कतार, इराक यासह अन्य अरब राष्ट्रांत मोठ्या प्रमाणात नाचणीला मागणी आहे. या नाचणी पासून पावडर तयार होते. याची रोजच्या आहारात तसेच औषध निर्मितीसाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात नाचणीला चांगला भाव मिळणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात हजारो टन उत्पादनाची क्षमता

नाचणी निर्यातीमध्ये कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश ही राज्ये भारतात आघाडीवर आहेत; पण कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील नाचणी उत्पादन क्षेत्र अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. सदर पीक क्षेत्र वाढण्यास अजूनही मोठा वाव आहे. बेळगाव जिल्ह्यातील अति पावसाच्या तालुक्यात मोठी संधी आहे. भातपिकाला पर्याय म्हणून नाचणीला वाव आहे. बेळगाव तालुक्याच्या शेजारील चंदगड तालुक्यात अलिकडील काही वर्षात नाचणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बेळगाव जिल्ह्याचा विचार करता कमाल 700 हेक्टर क्षेत्र आहे. चंदगड तालुक्यात 1900 हेक्टर तर आजरा तालुक्यात 1400 हेक्टर क्षेत्र आहे. यातून उत्पादकांना चांगले अर्थकारणही मिळत आहे. यामुळे कषी खात्याकडून प्रोत्साहन मिळाल्यास बेळगाव जिल्ह्यात किमान 5 हजार हेक्टरवर उत्पादन घेता येणे शक्य आहे.

12 वर्षांत नाचणीचा भाव चारपटीने वाढ

गत 12 वर्षापूर्वी नाचणीला प्रतिकिलो 7 ते 8 रु. किलो असा दर होता. यादरम्यान जागतिक स्तरावर नाचणी हळूहळू मागणी वाढत गेली याचा परिणाम म्हणून हाच दर सध्या प्रति किलो 26 ते 28 रु. झाला आहे. यामुळे भविष्यात हा दर आणखी वाढत जाईल, असे जाणकारांचे मत आहे.

यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष

केंद्र सरकारने यंदाचे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तृणधान्यांचे आहारातील महत्व, पर्यायाने आरोग्य जागृती, प्रसार व प्रचार आदी उद्देश ठेवून केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी निधी दिला आहे. या तृणधान्यात नाचणीला प्राधान्य दिले आहे. या अंतर्गत महाराष्ट्रासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

100 ग्रॅम नाचणीतील पोषक घटकांचे प्रमाण

उर्जा…..320.75 किलो कॅलरीज
कर्बोदके ……72 ग्रॅम
स्निग्ध पदार्थ….1.3 ग्रॅम
प्रथिने….7.16 ग्रॅम
तंतुमय पदार्थ…..3.44 ग्रॅम
फॉस्फरस…..2.83 ग्रॅम
कॅल्शियम…3.44 ग्रॅम

नाचणीचे आहारातील महत्त्व

  • तंतुमय पदार्थामुळे आतड्याच्या कर्करोगावर उपयोगी
  • कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित होते
  • बध्दकोष्ठतासाठी फायदेशीर
  • प्रथिनामुळे कुपोषणावर उपयुक्त
  • मधुमेह रुग्णांकरिता लाभदायक
  • नियमित सेवन हृदयाला लाभदायक
  • गर्भवती, मुले, आजारपणात सत्वयुक्त आहार
  • नाचणीतून जीवतसत्त्व ब मिळते

Back to top button