बेळगाव : कामगिरी दमदार, मंत्रिपदाचा ठोकणार चौकार! | पुढारी

बेळगाव : कामगिरी दमदार, मंत्रिपदाचा ठोकणार चौकार!

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसने दमदार कामगिरी केल्यामुळे वरिष्ठांचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले गेले आहे. राजकीयद़ृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात यावेळी चार मंत्रिपदे जवळपास निश्चित असून त्यामध्ये सतीश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव आघाडीवर आहेत.

जिल्ह्यातील प्रभावशाली नेत्यांमुळे राज्याच्या राजकारणाची गणिते अनेकदा बिघडली आहेत. सत्तांतर करण्याची कियमाही याच जिल्ह्यातून झाली आहे. गेली पाच वर्षे भाजपच्या झेंड्याखाली असलेल्या या जिल्ह्यात यावेळी 11 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. हा विजय इतका दमदार आहे की, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या दहा आमदारांत बेळगावातील पाच आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे भाजपचे पानिपत करण्यात यशस्वी ठरलेल्या काँग्रेस नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात चार मंत्रिपदे होती. आताही बेळगावला चार मंत्रिपदे मिळणार आहेत. जारकीहोळी यांचे नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद किंवा गृहमंत्री मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ते यावेळी साकार होईल की नाही, हे पाहावे लागेल. प्रकाश हुक्केरी हे विधान परिषद सदस्य असून त्यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी यांनी प्रबळ अशा रमेश कत्ती यांचा एकतर्फी पराभव केला आहे. त्यामुळे प्रकाश हुक्केरी यांचे नावही आघाडीवर आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेस प्रवेश करून जिल्ह्यातील चित्र पालटण्याची कामगिरी यशस्वी केली आहे. त्यांनी याआधी भाजपमध्ये विविध मंत्रिपदांवर काम केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही ते कार्यरत होते. आता जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा फडकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे दुसर्‍यांदा मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आणि विविध कारणांनी चर्चेत राहणार्‍या बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचेही नाव मंत्रिपदाच्या यादीत घेतले जात आहे. हेब्बाळकर या ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांच्या मर्जीतील आमदार असून त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे.

चांगल्या खात्यासाठी धडपड

जिल्ह्यातील सतीश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, प्रकाश हुक्केरी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद मिळणार आहे. पण, या चौघांनीही आपल्याकडे चांगले खाते मिळावे, प्रभावी कामगिरी करता यावी, यासाठी वरिष्ठांकडे चर्चा सुरू केल्याचे समजते.

चार सख्खे भाऊ बनले आमदार

कारदगा : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल हाती येताच बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी घराण्यातील चार सख्खे भाऊ पुन्हा एकदा आमदार बनले आहेत. आताच्या निवडणुकीत तीन सख्खे भाऊ विजयी झाले असून गत विधान परिषद निवडणुकीत एक भाऊ विजयी झाल्याने चार सख्खे भाऊ आमदार बनले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे दोन्ही भाऊ भाजपच्या तिकिटीवर निवडून आले. तिसरे बंधू सतीश जारकीहोळी हे काँग्रेस तिकिटावर निवडून आले आहेत. रमेश जारकीहोळी भाजपतर्फे गोकाक मतदारसंघातून भाजपतर्फे, भालचंद्र जारकीहोळी भाजपतर्फे आरभावी मतदारसंघातून, सतीश जारकीहोळी हे काँग्रेसतर्फे यमकनमर्डीतून विजयी झाले. विधान परिषदेत लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत.

Back to top button