बेळगावची काँग्रेसला साथ

बेळगावची काँग्रेसला साथ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गतनिवडणुकीत जिल्ह्यात 18 पैकी 13 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा अवघ्या सातच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या पूर्वी 5 असलेल्या जागा आता 11 वर पोहोचल्या आहेत. निकालपूर्व चाचण्यांचे अंदाज राज्यभरात खरे होत असताना, जिल्ह्यातही काँग्रेसने भाजपला जोरदार 'उलटा' हात लगावला आहे. अथणीतून लक्ष्मण सवदी यांना तिकीट डावलणे तसेच जिल्ह्यातील अन्य दोन आमदारांना तिकीट नाकारणे भाजपला महागात पडल्याचे निकालावरून दिसून येत आहे.

सवदींच्या प्रभाव असलेल्या तीन जागा भाजपने गमावल्या आहेत. तसेच ज्या दोन मतदारसंघांत आमदारांना भाजपने तिकीट नाकारले, त्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. अशा एकूण पाच जागांचा भाजपला थेट फटका बसला आहे. उपमुख्यमंत्रिपद देऊन मोठा नेता बनवलेल्या लक्ष्मण सवदींना अथणीतून तिकीट हवे होते. परंतु, भाजप हायकमांडने त्यांना नाकारले. याचा परिणाम म्हणजे, सवदी काँग्रेसमध्ये गेले आणि अथणी, कागवाड आणि कुडची या पूर्वीच्या तिन्ही भाजपच्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यात यशस्वीही ठरले. अथणीमधून भाजपचे महेश कुमठळ्ळी, कागवाडमधून माजी मंत्री आणि साखर कारखानदार श्रीमंत पाटील, तर कुडचीमधून पीएसआयची नोकरी सोडून आमदार बनलेले पी. राजीव या तिघांनाही पराभव पत्करावा लागला.

बेळगाव उत्तर : भाजपची मते फुटली

भाजपने बेळगाव उत्तरमधून आमदार अनिल बेनके यांना तिकीट नाकारत नवखे डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिली. शिवाय, येथे म. ए. समितीने एकच उमेदवार दिल्याने भाजपची मते फुटून काँग्रेसचे आ. राजू सेट विजयी झाले. असाच प्रकार भाजपने रामदुर्ग येथेही केला. येथील विद्यमान आ. महादेवाप्पा यादवाड यांना तिकीट नाकारत चिक्करेवाण्णा यांना उमेदवारी दिली. परंतु, त्याचा फायदा उठवत काँग्रेसचे माजी आमदार अशोक पट्टण यांनी भाजपचे चिक्करेवाण्णा यांचा पराभव केला. या पाच जागा भाजपने गमावल्याच, शिवाय सौंदत्ती-यल्लम्मा येथे भाजप उमेदवार स्व. आनंद मामणी यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जागी पत्नी रत्ना मामणी यांना भाजपने तिकीट दिले. परंतु, त्यांना सहानुभूती मिळू शकली नाही. येथून काँग्रेसचे विश्वास वैद्य जिंकले. त्यामुळे भाजपच्या या सहा जागा जिंकत व आधीच्या पाच कायम राखत 11 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे.

निपाणी : भाजपच्या जोल्ले यांनी गड राखला

निपाणी मतदारसंघातून भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी आपला गड कायम राखला. तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील दुसर्‍या, तर काँग्रेसचे काकासाहेब पाटील तिसर्‍या स्थानी राहिले.कर्नाटक प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघाचा गड कायम राखला. तेथे भाजपचे बसवराज हुंद्री आणि भाजपचे बंडखोर मारुती अष्टगी (निजद) यांना पराभव पत्करावा लागला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातही काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला गड राखताना गेल्या वेळेपेक्षा अधिक म्हणजे 54 हजार मतांनी विजय मिळवला.

खानापूरचा निकाल मात्र धक्कादायक होता. इथून काँग्रेसच्या उमेदवार व आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना भाजपचे विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 50 हजारांवर मतांनी पराभव पत्करावा लागला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news