बेळगाव : दक्षिण, उत्तर, ग्रामीणमध्ये गुलाल कुणाचा?

बेळगाव : दक्षिण, उत्तर, ग्रामीणमध्ये गुलाल कुणाचा?

Published on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपासून सगळेच कार्यकर्ते 'शनिवारी आंमचाच गुलाल' असे सांगत आहेत. काही जणांनी जल्लोषाची तयारी केली आहे, तर काही जणांनी चक्क कोल्हापूरला जाऊन मोठ्या प्रमाणात फटाकेही खरेदी केले आहेत. प्रामुख्याने बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा भरणा अधिक आहे. या तिन्ही मतदारसंघात प्रत्यक्ष कोण गुलाल उधळणार हे काही तासांतच समजणार असले, तरी गेल्या दोन दिवसांपासून उत्सुकता मात्र ताणली गेली आहे.

यंदाच्या निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांत प्रचंड उत्सुकता आहे. आक्रमक प्रचारात महाराष्ट्रातील नेत्यांची वर्दळ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह होता. प्रत्यक्ष मतदानाचे आकडेही सर्वांनाच गोंधळात टाकणारे आहेत. बेळगाव दक्षिणमध्ये सर्वाधिक चुरस पहायला मिळाली. भाजप, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस यामध्ये थेट लढत होती. त्यामध्ये आमदार अभय पाटील आणि समिती उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्यात थेट प्रचार दिसून आला. आक्रमक प्रचारसभा झाल्या. भाजपसमोर गड राखण्याचे आव्हान आहे आणि समिती जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत बेळगाव दक्षिणमध्ये 1 लाख 57 हजार 788 इतके मतदान झाले आहे. गतवेळेपेक्षा मतदानात किंचित वाढ झाली असली तरी कोणाची मते वाढली आणि कोणाची घटली, याबाबत अनेक तर्क, वितर्क लढवले जात आहेत. या निवडणूक प्रचारात काँग्रेस मागे पडली असली तर काँग्रेसला किती मते मिळणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

बेळगाव उत्तर

बेळगाव उत्तर मतदारसंघात यावर्षी काँग्रेस, भाजप आणि म. ए. समिती या तिन्ही पक्षांकडून नवीन उमेदवार देण्यात आले होते. समिती अस्तित्व दाखवण्यासाठी लढा देत आहे. तर काँग्रेस आणि भाजपमध्येच प्रामुख्याने रस्सीखेच रंगणार आहे. विविध धर्म आणि भाषिक मतांच्या आकडेवारीवर या मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य अवलंबून असते. यंदा या ठिकाणी मतांची टक्केवारी घटली आहे. 2 लाख 51 हजार 246 पैकी 1 लाख 49 हजार 338 इतकेच मतदान झाले आहे. त्यामुळे कोणाची मते घटली आणि कोणाकडे मते वळली, याचे गणित शेवटपर्यंत घालण्यात येत आहे. भाजप आणि काँग्रेसकडून विजयाचे दावे करण्यात येत असले तरी काही तासांतच प्रत्यक्ष गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होणार आहे.

बेळगाव ग्रामीण

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील वादामुळे या निवडणुकीत जबरदस्त ट्विस्ट येणार, असे भाकित आधीच वर्तवण्यात आले होते. पण, या लढाईत थोडा मागे पडल्याचे दिसून आले. त्यातच म. ए. समितीने जोरदार प्रचार यंत्रणा राबवून वातावरण तापवले. त्यामुळे काँग्रेसच्या मतांचे गणित बिघडणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा रंगत आहे. म. ए. समितीची एकजूट उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या पथ्यावर पडणार की आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सलग दुसर्‍यांदा विजय मिळवून राज्यात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यास मंत्रीपद मिळवणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

अनेकांचे देव पाण्यात

बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात चुरशीने निवडणूक झाल्यामुळे आणि प्रत्यक्ष मतदानानंतर अनेक अंदाज वर्तवण्यात आले असल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्तेही देव पाण्यात ठेऊन आहेत. या तिन्ही मतदारसंघातील विजयी उमेदवार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकतात, त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news