कर्नाटक विधानसभा निवडणूक : कशासाठी? निवडणुकीसाठी ! | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : कशासाठी? निवडणुकीसाठी !

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : नेहमी मराठी शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाला निवडणुकीच्या निमित्ताने मराठी शाळांची देखरेख व दुरुस्ती करण्याची तसदी घ्यावी लागली आहे. डिगेगाळी (ता. खानापूर) येथील शाळेच्या छत गळती बाबत वारंवार तक्रार करूनही लक्ष न देणार्‍या प्रशासनाने निवडणुकीसाठी मात्र तातडीने कार्यवाही करून मतदानासाठी नियुक्त कर्मचार्‍यांची गैरसोय दूर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही तत्परता का दाखवली जात नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

डिगेगाळी शाळेत मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. पण या शाळेची इमारत जिर्ण झाल्याने छताला गळती लागली आहे. अशातच वर्ग भरविले जातात. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या इमारतीत ठेवलेले निवडणुकीचे साहित्य, मतदान यंत्र यांच्या काळजीपोटी गळणार्‍या छतावर प्लास्टिक ताडपत्री टाकून तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना समस्येचा सामना करावा लागला. तेव्हा मात्र शिक्षण विभागासह कोणाचीही डोळे उघडले नाहीत. पण आता निवडणुकीच्या निमित्ताने दुरुस्तीचे सौजन्य दाखवावे लागले आहे. शाळांचा मतदान केंद्र म्हणून वापर होतो. त्यामुळे किमान निवडणुकांच्या निमित्ताने का असेना शाळांमध्ये असणार्‍या गैर सुविधांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळतो.

Back to top button