बेळगाव : भाजप-काँग्रेसमध्ये लढत, समितीची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

बेळगाव : भाजप-काँग्रेसमध्ये लढत, समितीची प्रतिष्ठा पणाला

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असणार्‍या बेळगाव जिल्ह्यात राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रीय नेत्यांनी सभा, रोड शो, प्रचारामध्ये सहभाग घेतल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रचारात भाग घेतल्याने दोन्ही राज्यातील मतदारांच्या नजरा बेळगावकडे लागून राहिल्या आहेत. तीन लोकसभा मतदारसंघामध्ये 18 विधानसभा मतदारसंघ असून निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस आहे. तर मराठी भाषिकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या म. ए. समितीने 5 मतदारसंघातून उमेदवार दिले असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारसंघात 185 उमेदवार रिंगणात आहेत.

बेळगाव दक्षिण

येथे म. ए. समिती व भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार अभय पाटील यांच्यासमोर म. ए. समितीने रमाकांत कोंडूसकर यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरवले होते. तर म. ए. समितीकडून खासदार संजय राऊत यांनी प्रचारसभा घेतली. काँग्रेसकडून प्रभावती मास्तमर्डी, निजदकडून श्रीनिवास ताळूकर यांच्यासह एकूण 8 जण रिंगणात आहेत.

बेळगाव उत्तर

याठिकाणी सर्वच पक्षांनी नवीन चेहर्‍यांना पसंती दिली आहे. म. ए. समितीने अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून असीफ उर्फ राजू सेठ तर भाजपने डॉ. रवी पाटील यांना संधी दिली आहे. याठिकाणी भाजपमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठी भाषिकांतून अ‍ॅड. येळ्ळूरकर यांना पाठिंबा वर्तवण्यात आला आहे. याठिकाणी सर्वाधिक 15 उमेदवार रिंगणात आहेत.

बेळगाव ग्रामीण

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यामधील राजकीय वादामुळे ग्रामीण मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. परंतु भाजपने नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षात काही प्रमाणात नाराजी आहे. आमदार हेब्बाळकर यांनी विकासकामांचा दावा करत प्रचार चालविला आहे. आर. एम. चौगुले यांना मराठी भाषिकांतून चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे त्यांचा उत्साह दुणावला गेला आहे. रिंगणात 12 जण आहेत. मतदारसंघात चुरशीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

यमकनमर्डी

आमदार सतीश जारकीहोळी यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. चौथ्या विजयासाठी ते सज्ज झाले आहेत. भाजपने मारुती अष्टगी यांना उमेदवारी नाकारत बसवराज हुंदरी यांना उमेदवारी दिली आहे. अष्टगी यांनी निजदच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात धाव घेतली आहे. म. ए. समितीने मारुती नाईक यांना संधी दिली आहे. भाजपच्या मतविभागणीचा फायदा जारकीहोळी यांना होणार आहे.

Back to top button