राष्ट्रीय नेत्यांकडून बेळगावात प्रचाराचा रतीब! | पुढारी

राष्ट्रीय नेत्यांकडून बेळगावात प्रचाराचा रतीब!

बेळगाव; अंजर अथणीकर :  गेल्या दहा, बारा दिवसांमध्ये विशेषत: बेळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीेय नेत्यांचे दौरे लक्ष वेधून घेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा, रोड शोमुळे ऐन विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीची अनुभूती येत आहे. भाजपने राज्यातील नेत्याना बाजूला सारुन विधानसभेची निवडणूक आपल्या हाती घेतली. काँग्रेसने राज्यातील नेत्यांवर आपली मदार सोपवली असली तरी गर्दी खेचण्यासाठी त्यांचाही भर राष्ट्रीय नेत्यांवरच होता. सुमारे 25 हून अधिक स्टार प्रचारकांनी जिल्हा पिंजून काढला.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचाराचा नाराळ फोडला होता. त्यानंतर केंद्रीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु होता. भाजपच्यावतीने फेब्रुवारीपासून विविध विकास कामांचे उद्घाटन, निधी मंजुरीची घोषणा सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दीड महिन्यात तीन वेळा बेळगाव जिल्ह्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी तीन सभा, एक रोड शो घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी तर बेळगावात मुक्कामच ठोकला. त्यांनी आतापर्यंत चार दौरे केले. रोड शो आणि सभांनी त्यांनी वातावरण ढवळून काढले. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी इतक्या सभा, रोड शो घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह, रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी या केंद्रीय मंत्र्यासह केंद्रातील भाजपा पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यात अनेक सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदींच्या सभा झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचीही सभा झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, कर्नाटकमधील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस.येडियुराप्पा, काँग्रेसचे सिध्दरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के.शिवकुमार, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी अशा स्टार प्रचारकांच्या जिल्ह्यात सभा, रोड शो झाले.

डोनाल्ड, ओबामा यायचे राहिले!

बेळगाव जिल्ह्यात आलेल्या नेत्यांची मांदियाळी पाहून आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संदेश फिरत असून, यामध्ये बेळगावमध्ये प्रचारासाठी फक्त डोनाल्ड ट्रंप, किम, पुतीन, ओबामा तेवढेच यायचे राहिलेत, अशा संदेशाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भाजपच्या राष्ट्रीय नेत्याकडून प्रचार हायजॅक

कर्नाटक विधानभेची निवडणूक असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस.येडियुराप्पा यांच्या एक दोन सभा वगळता भाजपच्या राष्ट्रीय नेत्यानीच प्रचार यंत्रणा ढवळून काढली. अगदी लहान शहरातही रोड शो करण्यात आला. यामध्ये राज्यस्तरावरील नेत्यांचा सहभाग दिसून आला नाही.

Back to top button