भाजप आमदार चोर : राहुल गांधी | पुढारी

भाजप आमदार चोर : राहुल गांधी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  भाजप सरकारने तीन वर्षांच्या काळात सामान्य जनतेला लुटण्याचे काम केले. त्यांनी गरीब, शेतकरी, मजूर, युवकांंना देशोधडीला लावले. तुम्ही बहुमताने निवडून दिलेले काँग्रेस सरकारही चोरले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राज्यात काँग्रेसची लाट असून विधानसभा निवडणुकीत 150 जागा मिळवेल, असा दावाही राहुल गांधी  यांनी केला.

शनिवारी बेळगावजवळ भूतरामहट्टी येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकाच्या जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत दिले होते. परंतु, भाजपने ते सरकार चोरण्याचे काम केले. आमच्या आमदारांना फोडून सरकार तयार केले. हे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आले. त्यामुळे तीन वर्षांत भ्रष्टाचार करण्याचेच काम त्यांनी केले. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून कर्नाटक सरकारची ओळख आहे.

राहुल पुढे म्हणाले, कंत्राटदार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 40 टक्के कमिशनबाबत तक्रार केली. परंतु मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केलेली नाही. पंतप्रधान मोदी राज्यात प्रचारासाठी येतात. पण एकदाही ते भ्रष्टाचारवर बोलले नाहीत. त्यांना दोन कोटी युवकांना रोजगार दिनाच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. राज्यातील जनतेसाठी काय करणार याबाबत एक शब्द बोलत नाहीत.

महाराष्ट्राचे माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधी देशभर भारत जोडोचा नारा नारा देत आहेत. तर भाजपकडून भारत तोडोचा नारा देण्यात येत आहे. यामुळे मतदारांनी भारत जोडोला प्राधान्य द्यायचे की भारत तोडला याचा निर्णय घ्यावा. काँग्रेसचे कार्याध्यक्ष सलीम अहमद, आमदार सतीश जारकीहोळी, चिकोडी लोकसभा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही मार्गदर्शन केले.

दहशतवादाबद्दल आम्हाला बोलू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाचे कारण सांगत समाजात दुफळी माजविण्याचे काम करत आहेत. दहशतवाद माझ्याइतका तुम्हाला माहीत नाही. दहशतवादामध्ये माझी आजी, माझे वडील मी गमावले आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना मारला.

Back to top button