कर्नाटकला नंबर वन राज्य बनवू : पंतप्रधान मोदी | पुढारी

कर्नाटकला नंबर वन राज्य बनवू : पंतप्रधान मोदी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकाला देशातील नंबर वन राज्य बनवू. त्यासाठी नियोजन तयार असून जनतेने साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस परिवारवादी तर निधर्मी जनता दल हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांच्या ‘शॉर्ट टर्म गर्व्हनन्स’च्या आमिषाला बळी पडू नका, अशी टीकाही मोदींनी केली.

बैलहोंगलनजीक बैलवाड गावाजवळ बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते.

मोदी म्हणाले, येत्या आठवडाभरात तुम्ही कर्नाटकचे भवितव्य निश्चित करणार आहात. कर्नाटक देशातील नंबर वन राज्य करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. यासाठी डबल इंजिन सरकारला जनतेनी साथ देण्याची गरज आहे. दिल्लीतील शाही काँग्रेस परिवारवादी तर जेडीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांच्या आमिषाला बळू पडू नका. दलित, मागासवर्गीयांमध्ये भांडणे लावून त्यांनी आपली व्होट बँक तयार केली. त्यांच्या युतीच्या काळात सर्वांगीण विकासाऐवजी सोयीनुसार काही प्रदेशाचाच विकास झाला.

 पाच वेळा ‘बजरंग बली की जय’

नेहमी ‘भारत माता की जय’ म्हणून भाषणाची सुरुवात करून याच जयघोषाने भाषणाची समाप्ती करणार्‍या मोदींनी आज या घोषणेबरोबर सुरुवातीला पाच वेळा आणि शेवटी पाच वेळा ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा दिली.

Back to top button