भाजपला फायदा होईल अशी कृती ‘राष्ट्रवादी’ने करू नये : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

भाजपला फायदा होईल अशी कृती ‘राष्ट्रवादी’ने करू नये : पृथ्वीराज चव्हाण

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे; मात्र कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून किंवा इतरांचा प्रचार करून राष्ट्रवादीने भाजपला फायदा होईल, अशी कृती करू नये, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.

कर्नाटकात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यात येत आहे. ते काही ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करत आहेत, तर इतर ठिकाणी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. याबाबत पत्रकारांना विचारता चव्हाण म्हणाले, कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीने निवडणूक लढविणे मला तरी योग्य वाटत नाही. आमची दिल्लीत आणि महाराष्ट्रात युती आहे. काँग्रेस उमेदवारांचे नुकसान होईल, अशी कृती राष्ट्रवादीने करू नये. याबाबत चर्चा करून नुकसान टाळता येऊ शकेल. राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द झाल्याने त्यांनी इतर राज्यात निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी यासंदर्भात काँग्रेसबरोबर चर्चा व्हायला हवी होती. आताही आम्ही चर्चेसाठी तयार असून, यातून मार्ग काढला पाहिजे.

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य

म. ए. समितीच्या विरोधात बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये, असे पत्र समितीने दिले असताना तुम्ही कसे आलात असे विचारता, चव्हाण म्हणाले, असे पत्र मला मिळाले नाही. अल्पसंख्याकांचे हक्क महाराष्ट्र असूदे किंवा कर्नाटक हे जोपासले गेले पाहिजे. सीमाप्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याठिकाणी दोन्ही सरकारे आपआपली बाजू मांडत आहेत. न्यायालय देईल तो निर्णय आम्ही मान्य करू.

Back to top button