Karnataka Elections : निपाणीच्या घोटाळेबाजांना घरी बसवा : सिद्धरामय्या | पुढारी

Karnataka Elections : निपाणीच्या घोटाळेबाजांना घरी बसवा : सिद्धरामय्या

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अनेक घोटाळे केले आहेत. निपाणीसारख्या सीमाभागातील तालुक्यातील भाजपच्या मंत्र्यांनी अंडी घोटाळा केला. अशा शशिकला जोल्ले यांच्यासह घोटाळेबाज नेत्यांना त्यांची जागा दाखवत पराभूत करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केले.
निपाणी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार माजी आ. काकासाहेब पाटील प्रचारार्थ मंगळवारी म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जाहीर प्रचार सभेत सिद्धरामय्या बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी आ. वीरकुमार पाटील होते. व्यासपीठावर केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आ. प्रकाश राठोड, आ. गणेश हुक्केरी, निरीक्षक मोहन जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुनील हणन्नण्णावर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील होते.

सिद्धरामय्या म्हणाले, भाजपच्या हातात कर्नाटकातील सत्तासूत्रे आल्यापासून राज्य भ्रष्टाचारात बुडाले आहे. त्यांनी या काळात विकासाऐवजी केवळ भ्रष्टाचाराच केला. त्यांनी गोरगरीब, दीनदलित,अल्पसंख्याक शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात काम केले. याचा विचार करण्याची वेळ जनतेसमोर आली आहे. कुणाच्या हाती सत्ता द्यायची हे जनतेने ठरवायचे आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यावरील भ्रष्टाचार पुसण्याचे काम करेल. गत निवडणुकीत जनतेने भाजपाला नाकारले होते. केवळ ऑपरेशन कमळ राबवून हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून मागच्या दरवाजाने भाजप सत्तेवर आलेले आहे. हा पैसा त्यांच्याकडून भ्रष्टाचार आणि जनतेची लूटमार करूनच मिळालेला आहे, अशी टीकाही सिद्धरामय्यांनी केली.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले, निपाणीचे उमेदवार काकासाहेब पाटील हे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहेत. पण जोल्ले जनतेशी प्रामाणिक राहिल्या का? त्यांचे मंत्रिपद बदलले? भ्रष्टाचारात गुरफटलेल्या लाचखोरांना येथून हटवा आणि काकासाहेब पाटील यांनाच विजयी करा. काकासाहेब पाटील यांनी कधीही मतदारसंघातील कामाखेरीज आपली भेट घेतली नाही. ते निपाणीच्या विकासासाठी निस्वार्थीपणे झटणारे नेते आहेत. असा आमदार निपाणीला पुन्हा मिळणे काळाची गरज आहे.

आ. प्रकाश हुक्केरी म्हणाले, आपल्याकडच्या 13 गावामधून काकासाहेबांना मोठे मताधिक्क्य देवू. राज्यात भाजपाने कोणताही विकास केला नाही. काकासाहेब पाटील यांनी पक्षाच्या तसेच जनतेच्या सेवेच्या आधारावर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असून सर्वांनी त्यांना साथ करून निवडून द्यावे.

काकासाहेब पाटील म्हणाले,15 वर्ष आमदार असताना निपाणी मतदारसंघात शाश्वत कामे करताना निपाणी तालुका निर्मिती, शेती आणि पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काळमवाडीचा आंतरराज्य पाणी करार पूर्ण केला.गेल्या दहा वर्षात सत्तेत नसलो तरी सर्वसामान्यांची बाजू धरून कायम त्याच्या पाठीशी राहिलो आहे. ही शेवटची निवडणूक असेल.

अण्णासाहेब हावले, सुमित्रा उगळे,राजेंद्र वडर, सुप्रिया पाटील, सूर्याजी पोटले, प्रमोद पाटील,अभिजीत बोधले,सीताराम पाटील, संजय कांबळे दादा जाधव, विनोद साळुंखे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास हालशुगरचे माजी चेअरमन सुकुमार पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष पंकज पाटील,युवा नेते रोहन साळवे, अनवर बागवान, शैला चडचळे शैला संकपाळ,रोहिणी दीक्षित,शंकरदादा पाटील, अशोक आरगे, दोस्तमहमद पठाण, अन्वर हुक्केरी,उमा पाटील ,बाबुराव खोत,सुजय पाटील ,शशिकांत पाटील दत्तात्रय,युवराज पोळ,रवींद्र श्रीखंडे, अशोक लाखे,किसन दावणे,शरीफ बेपारी, श्रीनिवास संकपाळ आदी उपस्थित होते.

मराठा समाजाने एक व्हावे

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी म्हणाले, निपाणी मतदारसंघात मराठ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सत्तेच्या लोभापायी काही जणांनी त्यांची दिशाभूल केलेली आहे. परंतु आता जागृत होण्याची गरज असून मराठी समाजाने ताकद दाखवावी.

Back to top button