Karnataka Elections : मंत्री जोल्ले विरोधकांना भारी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादन | पुढारी

Karnataka Elections : मंत्री जोल्ले विरोधकांना भारी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतिपादन

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधींनी दीनदलितांचा अपमान केला आहे. भाजपने रामनाथ कोविंद व द्रौपदी मुर्मू या दलित व आदिवासी नेत्यांना राष्ट्रपती केले. त्यांना साधा नमस्कार राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी केलेला नाही. गरीब, शोषित व वंचिताची भाषा त्यांना शोभत नाही. भाजपने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण रद्द करून गरीब वक्कलिग समाजाला दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी विरोधक आटापिटा करत आहेत. ते शक्य नाही. शिवाय मंत्री शशिकला जोल्ले विरोधकांना भारी पडल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

विद्या संवर्धक मंडळाच्या मैदानावर महिला प्रचार सभेत मंत्री इराणी बोलत होत्या. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णेश्वरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, भाजप निरीक्षक अजित गोपच्यागोळ, शांभवी अनंतपूर, हालशुगरचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे यांची उपस्थिती होती.

इराणी म्हणाल्या, माहेरच्या माणसांनी आपल्या मुलीला पुन्हा निवडून देण्यासाठी पाठीशी राहावे. जोल्ले यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जयंत पाटील येऊन गेले. त्यांनी आपले घर प्रथम सांभाळावे. आता शरद पवार येणार आहेत. तसेच काँग्रेसच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या येत आहेत. या सर्वांना शशिकला जोल्ले यांची ताकद दाखवून द्या. राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडायची वेळ आली आहे. काँग्रेसचा हात जिथे आहे तेथे थांबला आहे. मोदींनी देशातील नागरिकांना कोरोना काळात मोफत लसीकरण केले. मोफत रेशन वाटप केले. शेतकर्‍यांना वार्षिक 10 हजारांचे अनुदान दिले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, डबल इंजिनच्या सरकारमुळे केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकारने महिला सशक्तीकरणाचे काम हाती घेतले आहे. महिलांना उद्योगासाठी सबसिडी दिली जात आहे. याचा अनेक महिलांनी लाभ घेतला असून त्या विविध क्षेत्रात चमकत आहेत. निपाणी मतदारसंघात शशिकला जोल्ले यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळेच त्यांना तिसर्‍यांदा संधी देण्यासाठी मतदारांनी पुढे यावे.

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा केली आहे. योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी महिला व युवकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ मतदार संघातील नागरिकांना दिला आहे. विकासकामांबरोबर युवकांना रोजगार देण्याचे काम आपण केले आहे.

हालसिद्धनाथ कारखाना व बिरेश्वर संस्थेमध्ये दोन हजार युवकांना रोजगार दिला आहे. निवडणुकीनंतर आणखी तरुणांना रोजगार दिला जाईल. विरोधक भूलथापा मारीत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपणास तिसर्‍यांदा निवडून देऊन निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आशीर्वाद द्यावा.

विभावरी खांडके यांनी स्वागत केले. सभेला नगरसेविका गीता पाटील, कावेरी मिरजे, सुजाता कदम, अरुणा मुदकुडे, प्रभावती सूर्यवंशी, रंजना इंगवले, सोनाली उपाध्ये, सरोज जमदाडे, पवन पाटील, एस. एस. ढवणे, हरिश्चंद्र शांडगे, सिद्धू नराटे, प्रणव मानवी यांची उपस्थिती होती. सोनल कोठडीया यांनी सूत्रसंचालन केले. विजय राऊत यांनी आभार मानले.

Back to top button