बेळगाव : यल्लम्माच्या दरबारातही मराठी-कन्नड वाद | पुढारी

बेळगाव : यल्लम्माच्या दरबारातही मराठी-कन्नड वाद

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सौंदत्ती येथील रेणुका देवस्थानला भाविकांची नेहमी गर्दी होत असते. मंगळवारी मंदिराच्या परिसरात कानडी, मराठी भाषेवरुन सीमाभागातील भाविक व मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दीक चकमक घडली. मंदिरात प्रवेश देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भक्तांनी केली.

देवस्थानात थेट दर्शनाला 500 रुपये, तर लांबून दर्शन घेण्यासाठी 100 रुपये आकारण्यात येतात. मंगळवारी थेट दर्शनाच्या रांगेत एकाच प्रवेश पावतीवर कर्मचार्‍याने चिरीमिरी देऊन पाचजणांना आत सोडल्याने बेळगावमधील भाविकांनी कर्मचार्‍याला याबाबत जाब विचारला. यावेळी आपले पितळ उघडे पडते म्हणून त्या कर्मचार्‍यांनी कानडीमधून बोला, हे कर्नाटक आहे, असे सांगून वाद उकरून काढला. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. मात्र देवस्थानच्या नावावर भ्रष्टाचार करणार्‍या कर्मचार्‍यांना कानडीच्या नावाखाली सवलत मिळाल्याचा आरोप भक्तांनी केला. सदर देवस्थान सरकारी असून या ठिकाणी जमाणारा महसूल सरकारी तिजोरीत जमा होतो. मात्र तेथे कार्यरत असलेले कर्मचारी रेणूका भक्तांकडून दुप्पट पैसे उकळत आहेत, असा आरोप भाविकांनी केला. याबाबत देवस्थान अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

यल्लम्मा देवस्थानमध्ये थेट दर्शन देताना भ्रष्टाचार होत आहे. सीमाभागातील मराठी भक्तांना कानडी भाषेतून बोलण्यासाठी भाग पाडले जात आहे. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक देवीचे दर्शन घेताना कन्नड-मराठी भेदभाव करत आहेत. याकडे देवस्थान कमिटीने लक्ष घालावे.
– गोपाळ किल्लेकर, रेणुकाभक्त

Back to top button