बेळगाव : खानापुरात समितीच्या फलकावर वक्रदृष्टी; मराठी अस्मितेवर घाला | पुढारी

बेळगाव : खानापुरात समितीच्या फलकावर वक्रदृष्टी; मराठी अस्मितेवर घाला

खानापूर : पुढारी वृत्तसेवा : रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेला म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाचा फलक आज पोलिस बंदोबस्तात काढून जप्त करण्यात आला. निवडणूक विभागाच्या या बेबंदशाहीचा तालुक्याच्या सर्व थरातून निषेध करण्यात येत असून मराठी भाषिकांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

दोनवेळा समिती कार्यालयाचा फलक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतीने तो उलथून टाकला होता. आज नगरपंचायतीचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि निवडणूक विभागाचे अधिकारी पोलिस बंदोबस्तात समिती कार्यालयासमोर हजर झाले. त्यांनी समिती कार्यालयाचा फलक बेकायदेशीर असल्याचे सांगत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, माजी आमदार दिगंबर पाटील, नारायण कापोलकर, गोपाळ पाटील आदींसह तरुण कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकार्‍यांनी फलक लावण्यासाठी दिलेले परवानगी दाखवून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध झुगारून पोलिसांकरवी कार्यकर्त्यांवर दांडगाई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन छेडत अधिकार्‍यांच्या कारवाईचा निषेध नोंदविला. त्याकडे दुर्लक्ष करत फलक उतरवून जप्त करून नेण्यात आला. निवडणूक विभागाने सुरुवातीपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत समिती कार्यकर्त्यांवर नाहक दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार : अ‍ॅड. बिर्जे

खानापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा फलक बेकायदेशीरपणे फलक हटवण्यात आला असून याविरोधात आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी दिली आहे.

तालुक्यातून मराठी अस्मिता संपविण्याचा प्रशासनाने डाव आखला आहे. निवडणूक विभागाने तटस्थपणे आपली भूमिका बजावणे आवश्यक असताना मराठी द्वेष्ट्यांनी केलेल्या तक्रारीचे निमित्त पुढे करून फलक हटवण्याची केलेली कारवाई निषेधार्ह आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी तयारी सुरू आहे.
– यशवंत बिर्जे, कार्याध्यक्ष, म. ए. समिती

Back to top button