बेळगाव : ‘रमजान ईद’ची लगबग, मुस्लिम बांधवांचा खरेदीकडे कल | पुढारी

बेळगाव : ‘रमजान ईद’ची लगबग, मुस्लिम बांधवांचा खरेदीकडे कल

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  इस्लाम धर्मामध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या रमजान महिन्याचे 26 रोजे पूर्ण झाले असून मंगळवारी ताक रात (बडी रात्र) भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज, कुराण पठण व अन्य धार्मिक विधी करत पूर्ण रात्र जागून काढली. रमजान तोंडावर आल्याने बाजारात रोज उच्चांकी उलाढाल होत आहे.

शनिवारी होत असलेल्या रमजान ईदचे वेध लागल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग वाढली आहे. शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, दरबार गल्ली अशा प्रमुख ठिकाणी सुकामेवा, कपडे व अन्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथील टेलर व्यावसायिकांच्या दुकानाबाहेर हाउसफुल्लचे फलक लागले आहेत. त्यामुळे तयार कपडे खरेदीकडे बहुतांश नागरिकांचा कल आहे.

रमजान ईद जवळ येत असल्याने नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. रात्री उपवास सुटल्यानंतर नागरिक कुटुंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. रात्री उपवास सोडल्यानंतर पुन्हा सकाळी सूर्योदयापूर्वी सहरी करुन कडक रोजाला सुरुवात होते. सायंकाळी इफ्तारच्या वेळेला विविध फळ सेवनाने रोजा सोडला जातो.

बाजारपेठेत विविध फळांना मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. सुका मेवा विक्री दुकानात गर्दी होत असून उलाढाल वाढली आहे. महिलांसाठी बाजारात कपडे, सौंदर्य प्रसाधने, मेहंदी आदींच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. कपड्यांबरोबर चप्पल, बूट खरेदीची लगबग सुरु आहे. दोनशे ते अडीचशे रुपयांदरम्यान मिळणार्‍या कापडी बुटांना मागणी आहे. रमजान पर्वाच्या अखेरच्या टप्प्यात दोन दिवस खरेदीची आणखी लगबग वाढणार आहे.

इफ्तारच्या वेळी गर्दी

रमजान पर्व सुरू झाल्यापासून मुस्लिमबांधवांनी दिनचर्या पूर्णपणे बदलली आहे. रोजाच्या कालावधीत साधारण सकाळी पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे उपाशी राहावे लागते. त्यानंतर इफ्तारच्या वेळी मात्र शहर व परिसरातील बाजारपेठ, मशिदीच्या शेजारी खाद्य पदार्थांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून येत आहे.

Back to top button