बंगळूर : शेवटच्या ठेक्यात ५० टक्के कमिशन; तीन महिन्यांवर निवडणूक असताना संकेतभंग : सिद्धरामय्यांचा आरोप | पुढारी

बंगळूर : शेवटच्या ठेक्यात ५० टक्के कमिशन; तीन महिन्यांवर निवडणूक असताना संकेतभंग : सिद्धरामय्यांचा आरोप

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी भाजपच्या कार्यकाळात घाईगडबडीत दिलेले कंत्राट हे 50 टक्के कमिशनचे असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तीन महिने आधी कोणतेच कंत्राट सरकारने देऊ नये, असा संकेत आहे. तशी मागणी आम्ही वारंवार करत आलो आहोत. मात्र, घाईगडबडीत भाजपने 50 टक्के कमिशन घेऊन काही विकासकामांचे कंत्राट दिले. निवडणूकपूर्व तीन महिन्यांत निविदा काढू नये, कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) जारी करू नये, याची आठवण आम्ही करून दिली होती. तरीही भाजपने त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुकीसाठी पैसे घेऊन कामांचे कंत्राट दिले आहे. काही कामे सुरूही झाली आहेत.

सिद्धरामय्यांच्या या आरोपावर सायंकाळपर्यंत भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी कर्नाटक दौर्‍यावर आले असून, ते धारवाडमध्ये उतरले आहे. ते या आरोपांना बुधवारी उत्तर देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीत शेट्टरांना माय मतदारसंघच

काँग्रेसने मंगळवारी उमेदवारांची चौथी आणि अंतिम यादी जाहीर करताना भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना त्यांचाच ‘हुबळी-धारवाड मध्य’ हा मतदारसंघ दिला आहे. काँग्रेसने सात उमेदवारांची चौथी जाहीर केली. त्यात चिक्कमगळूरमधून एच. डी. थम्मय्या यांचे नाव प्रमुख आहे.

 

Back to top button