

बंगळूर; वृत्तसंस्था : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कर्नाटकात राजकीय खळबळ उडाली असली तरी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पक्षाने त्यांच्यावर असा काय अन्याय केला की, त्यांना थेट काँग्रेसमध्येच जावे वाटले, असा सवाल करीत त्यांनी खुशाल जावे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपने तिकीट नाकारल्याने शनिवारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून अनेक नेते नाराज झाले आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाने त्यांना त्यांच्याऐवजी कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. शेट्टर यांना राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रिपद देण्याचीही ऑफर दिली होती. तरीही त्यांना काँग्रेसमध्येच जावे वाटले हे धक्कादायक आहे. पक्षाने त्यांच्यावर काय अन्याय केला, असा सवाल येडियुराप्पा यांनी केला.
शेट्टर यांच्या या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन्ही नेत्यांनी त्यांना फोन करून दिल्लीत मोठे पद देण्याची तयारी दिली होती. आपण स्वत: त्यांना धारवाडमध्ये तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला तिकीट देण्याचा शब्द दिला होता.