डॉ. आंबेडकर यांची निपाणीला तीनवेळा भेट; भेटीच्या स्मृती छायाचित्र रूपाने संग्रहित | पुढारी

डॉ. आंबेडकर यांची निपाणीला तीनवेळा भेट; भेटीच्या स्मृती छायाचित्र रूपाने संग्रहित

निपाणी; राजेश शेडगे : भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले. आज डॉ. आंबेडकर यांची 132 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे.

डॉ. आंबेडकर हे 11 एप्रिल 1925 रोजी निपाणी येथील सरकारी विश्रामधाम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी दत्तोबा कराळे यांच्या घोड्यावर बसून सवारीचा आनंद लुटला होता. 30 ऑक्टोबर 1938 रोजी डॉ. आंबेडकरांनी निपाणी नगरपालिकेत भेट दिली होती. त्यावेळी नगराध्यक्ष देवचंद शाह यांनी त्यांचा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान आणि सत्कार केला होता. 25 डिसेंबर 1952 रोजी त्यांची म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर जाहीर सभा झाली होती. निपाणीतील शिल्पकार बापू मडिलगेकर यांनी बाबासाहेबांना समोर खुर्चीवर बसून त्यांचा पुतळा निर्माण केला होता.

बाबासाहेबांच्या या दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह इतिहासाचा ठेवा जतन करण्याचे काम निपाणी येथील आर्टिस्ट दीपक मधाळे व संतकुमार मधाळे बंधूंनी केला आहे. त्यांच्याकडे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्यासह राष्ट्रीय महापुरुषांची मूळ दुर्मीळ छायाचित्रे जीवनपट संग्रह आहे. गेल्या 30 वर्षांत मधाळे बंधूंनी विविध शाळा महाविद्यालय येथे प्रदर्शन भरून लोकांचे प्रबोधन केले आहे. बाबासाहेबांच्या सान्निध्यात आलेले डॉ. श्रीकांत वराळे यांच्या घरी आंबेडकर आले होते त्यांच्या काही स्मृती त्यांनी जतन  करून ठेवल्या आहेत. निपाणी शहरात तीन ते चारवेळा डॉक्टर आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्यांच्या स्मृतींचे स्मारक उभारण्यासाठी गव्हाणी येथील दहा एकर जागा शासनाने मंजूर केली आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या स्मारकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोड्यावर बसलेला पुतळा उभारण्यात येणार आहे.

आजच्या पिढीसमोर मूळ छायाचित्रातून प्रेरणा मिळेल, या उद्देशाने मधाळे बंधू यांनी छायाचित्र संग्रहित ठेवले आहेत सध्या देशात विविध कारणांनी गोंधळ माजला आहे अशा परिस्थितीत शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार देशाला तारू शकणार आहेत या उद्देशानेच आंबेडकरांच्या दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह सर्वांना प्रेरणा देणारा आहे. यातूनच आदर्श विचाराने सुसंस्कृत देश घडण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास दीपक मधाळे यांनी व्यक्त केला.

Back to top button