आता एटीएम देणार कापडी बॅग | पुढारी

आता एटीएम देणार कापडी बॅग

चिकोडी; काशिनाथ सुळकुडे :  पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक मुक्त समाज निर्माण करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याचाच भाग म्हणून आता राज्यात प्रायोगिक तत्वावर पहिले एटीएम क्लोथ वेंडिंग मशीन चिकोडी शहरात बसविले जात आहे.

संपूर्ण जग आज पर्यावरण प्रदूषणामुळे त्रस्त असून जागतिक तापमान वाढ व पर्यावरनाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरण प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक आहे. प्लास्टिक कुजत नसल्यामुळे ते जाळल्यास विषारी वायू बाहेर पडतात. तसेच प्लास्टिक पिशव्या व साहित्य टाकल्याने गटारी, नद्या, नाले तुंबून पाणी प्रदूषणासह जलचर मृत्युमुखी पडतात. आज जगासमोर प्लास्टिक कचर्‍याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी केंद्र व राज्य सरकारांनी प्लास्टिक वस्तू वापरावर बंदी आणली आहे. स्थानिक प्रशासन व्यापार्‍यांवर कारवाई करते. पण तरीदेखील प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरूच आहे. यासाठी प्लास्टिकला पर्यायी पिशव्या उपलब्ध होणे आवश्यक असून नागरिकांनी बदल स्वीकारणे गरजेचे आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी आता पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. राज्यात पहिलेच एटीएम क्लोथ वेंडिंग मशीन चिकोडीत बसविले जाणार आहे. या मशीनद्वारे नागरिकांना 10 रूपयांचे नाणे टाकल्यास कापडी पिशवी मिळणार आहे. चिकोडी शहरातील बसस्टॅन्डपासून जवळ केसी रस्त्याला लागून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे मशीन बसविले जाणार आहे. सदर मशीन तामिळनाडूमधून मागविण्यात आलो आहे.
कर्नाटक राज्य परिसर प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषद चिकोडी व तालुका कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे मशीन बसविण्याचे उपक्रम राबविला जात आहे.
शहरात आजपर्यंत प्लास्टिक विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून 4 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हे मशीन बसविल्यानंर शहरात प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली जाणार आहे. राज्यात पहिले मशीन चिकोडीत बसविले जात आहे. येथे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामुळे चिकोडीच्या नावलौकिकेत भर पडणार आहे.

संपूर्ण राज्यात पहिल्यांदा चिकोडीत एटीएम क्लोथ वेंडिंग मशीन बसविले जाणार आहे. याद्वारे कापडी पिशवी देऊन प्लास्टिकमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्लास्टिक विक्रीप्रकरणी वर्षभरात 4 लाख रुपये दंड व्यापार्‍यांकडून वसूल करण्यात आला आहे. पुढील काळात 100 टक्के प्लास्टिक बंदी केली जाणार आहे.
– व्ही. रमेश
प्रादेशिक अधिकारी, प्रादेशिक कार्यालय चिकोडी

Back to top button