बेळगाव : रायबाग मतदारसंघात काँग्रेसचा ‘हात’ कोणावर?

बेळगाव : रायबाग मतदारसंघात काँग्रेसचा ‘हात’ कोणावर?
Published on
Updated on

अंकली : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. रायबाग विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दुर्योधन ऐहोळे विजयाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

मतदारसंघात नेत्यांविना काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काँग्रेस उमेदवारीवरुन दोन गट पडले असून कोणाला उमेदवारी मिळणार आणि आ. ऐहोळे यांना कोण आव्हान देणार, अद्याप हे गुलदस्त्यात आहे. रायबाग विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. सलग तीनवेळा येथून आमदार डी. एम. ऐहोळे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. चौथ्यांदा रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी तयारी चालविली आहे.

आ. ऐहोळे विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. गत 5 वर्षात कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून विविध विकासकामे राबविली आहेत. विशेषतः भेंडवाड व करगाव तलाव भरणी योजना राबवून अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. सामान्य कार्यकर्त्यात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे हा त्यांचा स्वभाव त्यांना मदत करणारा ठरणार आहे.

भाजप पक्षश्रेष्ठींकडून आ. ऐहोळे यांच्याऐवजी अन्य उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींकडून राज्यातील अनेक मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदारांचा उमेदवारीचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा असून यामध्ये आ. ऐहोळे यांचेही तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता चर्चिले जात आहे.

काँग्रेसची अवस्था रायबाग मतदारसंघात नेत्याविना पक्ष अशी आहे. काँग्रेस उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे अनेकांनी मागणी केली आहे. यामध्ये गतवेळी अपक्ष म्हणून पराभूत झालेल्या महावीर मोहिते आणि निवृत्त आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर यांच्यात उमेदवारासाठी चुरस लागली आहे. महावीर मोहिते हे आमदार सतीश जारकिहोळी यांचे कार्यकर्ते आहेत.

गतवेळी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मतदारसंघात सध्या काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत आहेत. एका गटाकडून महावीर मोहिते यांना सोबत घेऊन प्रचारास प्रारंभ झाला आहे. दुसरा गट शंभू कल्लोळकर यांच्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याचे चित्र पाहता काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. शंभू कल्लोळकर हे निवृत्त आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी तामिळनाडू येथे सेवा बजावली आहे. प्रशासनातील त्यांचा अनुभव पाहता मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार दिल्यास भाजपाला टक्कर देता येईल. याचा विचार करून कल्लोळकर यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे.

निजदही निवडणूक रिंगणात उतरणार

रायबाग मतदारसंघात माजी आ. विवेक पाटील व त्यांचे बंधू प्रताप पाटील यांना मानणारा गटही कार्यरत आहे. विवेक पाटील हे भाजपामध्ये असून आ. रमेश जारकीहोळी यांच्या गटातील आहेत. प्रताप पाटील हे निजदचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन निवडणुकीत प्रदीप माळगे यांनी एकदा अपक्ष व एकदा काँग्रेसकडून लढले होते. त्यांना दोन्हीवेळी पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रदीप माळगे हे निजदकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news