बंगळूर : रमेश जारकीहोळींवरून गृहकलह; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार

बंगळूर : रमेश जारकीहोळींवरून गृहकलह; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या भाजपने निवडणुकीसाठी रणनीती आखताना बंगळूरनंतर सर्वाधिक लक्ष बेळगाववर केंद्रित केले आहे; मात्र जिल्ह्यातील भाजपचे मूळ नेते आणि भाजपला सत्तेवर आणण्यास कारणीभूत ठरलेले किंगमेकर आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचला असून, आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळींना आवरा, अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे.

बेळगावमधील मूळ भाजप नेते आणि संघ परिवाराचे नेते रमेश जारकीहोळी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्याकडे कोणतीच महत्त्वाची जबाबदारी देऊ नका, अशी मागणी हायकमांडकडे करण्यात आली आहे. भाजपने दबावाच्या राजकारणाला बळी पडू नये. पहिल्यापासूनच रमेश जारकीहोळी दबावाचे राजकारण करत आले आहेत. त्याला पूर्णविराम देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप हा नेत्यांचा पक्ष न होता कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला पाहिजे; मात्र रमेश जारकीहोळी नेहमीच याविरोधात वागत आहेत. त्यांना वेळीच समज द्यावी. त्यांना त्यांच्या मतदारसंघापुरते सीमित ठेवा, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

यांचा पुढाकार

आ. रमेश जारकीहोळी यांना विरोध करण्यात खासदार इराणा कडाडी, माजी आ. लक्ष्मण सवदी, महांतेश कवटगीमठ आणि आ. अभय पाटील यांनी आघाडी घेतली आहे. कडाडी हे गोकाक तालुक्यातीलच आहेत, तर लक्ष्मण सवदी यांच्याऐवजी अथणीतून महेश कुमठळ्ळी यांना भाजपची उमेदवारी द्यावी, अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी भाजपकडे केली आहे.
जिल्ह्यात मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मात्र स्थानिक नेत्यांमधील मतभेद पक्षाच्या हायकमांडला डोकेदुखी ठरली आहे. राज्यातील काँग्रेस-निजद युती सरकारचे पतन झाल्यानंतर भाजपला सत्तेवर आणण्यास कारणीभूत ठरली ती रमेश जारकीहोळी यांची बंडखोरी. ते 17 आमदारांसह सरकारमधून बाहेर पडल्यामुळे जुलै 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर रमेश जारकीहोळी आणि समर्थक आमदार भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आले आणि बी. एस. येडियुराप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले. या सत्ताबदलानंतर रमेश जारकीहोळी भाजप हायकमांडच्या अधिक जवळ गेले. शिवाय एक प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र त्याला स्थानिक भाजप नेत्यांचाा विरोध आहे.

पर्यायाचाही शोध

आ. रमेश जारकीहोळींविरुद्ध तक्रार करून न थांबता रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात पर्यायी नेता निर्माण करण्याची प्रक्रियाही भाजपच्या एका गटाने सुरू केली आहे. गोकाकमधील उप्पार समाजातील मतदारांची संख्या सुमारे 30 हजार आहे. या समाजातील प्रभावी नेत्याला पुढे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदाशिव गुदगगोळ संघ परिवाराच्या मदतीने प्रचारात गुंतले आहेत. लवकर ते आपल्या समाजाची बैठक घेऊन पुढील रूपरेषा आखणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जारकीहोळींचा इशारा

भाजपची कोअर कमिटी बैठक होण्यापूर्वी आ. रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री निवासाला भेट देऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंशी चर्चा केली. अथणी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश कुमठळ्ळी यांना तिकीट द्या. मला गोकाकमध्ये तिकीट न दिले तरी भीती नाही. मुलगा अमरनाथला तिकीट द्यावे; मात्र अथणीमध्ये कुमठळ्ळी वगळता कुणालाही तिकीट दिल्यास परिस्थिती गंभीर होईल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. आ. जारकीहोळींच्या इशार्‍याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून अमित शहा यांनी हा विषय आपल्याकडे सोडा. यावर आपण तोडगा काढू, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news