निपाणी; राजेश शेडगे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कोण व चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कोण, याची उत्सुकता मतदार व कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागात विकासकामांचे नारळ फोडण्याबरोबर त्यांनी निवडणुकीचा प्रचार चालू केला आहे. त्याचबरोबर युवा नेते उत्तम पाटील यांनी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेसच्या शिडात मात्र गेले आठ दिवस सारे काही शांत-शांत असे वातावरण आहे. त्यामुळे निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे इच्छुक उमेदवार काकासाहेब पाटील यांनी माघार घेतल्याची चर्चा सोमवारी सोशल मीडियावर सुरू होती. या वृत्ताचा टीम काका पाटील सोशल मीडिया ग्रुपने इन्कार केला. उमेदवारीबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, अशी पोस्ट व्हॉट्सअॅपवर फिरत होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंत्री शशिकला जोल्ले व उत्तम पाटील यांनी गावागावांतून हळदी-कुंकू व होम मिनिस्टर च्या माध्यमातून संपर्क दौरे सुरू ठेवले आहेत. दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीची चर्चा जोरदार रंगली आहे. काकासाहेब पाटील यांनी संदिग्ध वातावरण निर्माण केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचलता आहे.
निपाणीत भाजपचं ठरलं, काँग्रेसच्या उमेदवारीकडे लक्ष असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वादळापूर्वीची शांतता निपाणीतून दिसून येत आहे. मंत्री शशिकला जोल्ले यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी स्वपक्षातील नेते मंडळी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. यातूनच माजी खासदार रमेश कत्ती यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार, असे वृत्त पसरले आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे. हे उमेदवारी जाहीर झाल्यावरच समजणार आहे. कत्ती यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निपाणीतून उमेदवारी घेतली तर निपाणी विधानसभेच्या निवडणुकीकडे सार्या राज्याचे लक्ष लागून राहील. ही निवडणूक लक्षवेधी ठरेल. काकासाहेब पाटील यांनी उमेदवारी नको म्हटली तर काँग्रेस पक्षासमोर जोल्ले यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान असणार आहे.
चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनाच चिकोडीतून भाजपची उमेदवारी घ्या, अशी गळ घातली जात आहे. महांतेश कवटगीमठ व जगदीश कवटगीमठ यांनी या निवडणुकीत इंटरेस्ट दाखवलेला नाही. त्यामुळे गणेश हुक्केरी यांची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी भाजप कोणता तगडा उमेदवार देणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. हुक्केरी पिता-पुत्रांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार प्रचार चालू ठेवला आहे.
मार्च महिना संपत आला आहे. निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी हिशेबाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी व चिकोडी मतदारसंघात केले जात आहे. निपाणी शहरात बुधवार, दि. 29 रोजी म्युनिसिपल हायस्कूल येथे हळदीकुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदरीत निवडणुकीच्या तोंडावर महिलांची करमणूक होत आहे. कार्यकर्ते मात्र निवडणुकीचे आडाखे मांडण्यात गुंतला आहे.