पॅनकार्डला आधार लिंकसाठी 31 ची डेडलाईन | पुढारी

पॅनकार्डला आधार लिंकसाठी 31 ची डेडलाईन

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारने पॅनकार्ड-आधार लिंक करण्याची घोषणा केल्यानंतर 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता 31 मार्चपर्यंत लिंक न केल्यास 1 हजारपासून दहा हजार रुपये दंड करण्यासह पॅन क्रमांक निष्क्रिय होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निपाणी परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली आहे. याबाबत म्हणावी तशी जनजागृती न झाल्याने आधार लिंकसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शहर व ग्रामीण भागातून होत आहे.

काही नागरिक एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बनवून त्यांच्या सोयीनुसार वापरतात. बँकेत वेगवेगळे पॅनकार्ड देऊन व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कर टाळला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने जुलै 2017 पासून पॅन आधार लिंक करण्याचे आदेश दिले होते. आधार लिंक न केल्यास आयटी रिटर्न भरता येणार नाही. पॅनकार्ड नसल्यास केवायसी लिंक करण्यात अडचण येणार असल्याचे म्हटले आहे.

www.incometax.gov.in वेबसाइटवर जाऊन आधार लिंक उघडल्यावर माहिती मिळेल. 1 हजार रुपये शुल्क भरून लिंकिंग करता येणार आहे. आधारशिवाय फक्त पॅनकार्ड असलेल्या 80 वर्षांवरील नागरिकांसाठी सूट दिली आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ते कोणत्याही श्रेणीत येत नसेल तर त्यांना नवीन पॅनकार्डसाठी दंड भरण्याची गरज नाही. अनेकांच्या पॅनकार्ड व आधार कार्डमध्ये नाव तसेच जन्मदिनांक यासारख्या काही चुका असल्याने अनेकांचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होताना अडचणी येत आहेत.

पॅन क्रमांक रद्द केल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरता येत नाही. आधार कार्ड लिंक नसल्यास 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे आणि 50 हजार रुपयांपेक्षा जास्त एफडी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पॅनकार्डशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
– सतीश चव्हाण सीएससी सेंटर चालक,निपाणी

पॅनकार्ड बाबत शहर आणि ग्रामीण भागात बँका किंवा महसूल खात्याने कोणत्याही प्रकारची जनजागृती केलेली नाही. आता अचानकच पॅन कार्डला आधार लिंक करण्याची सूचना केली आहे. तसे न झाल्यास अनेकांची पॅनकार्ड रद्द होणार आहेत. शिवाय सर्वसामान्यांची दंड भरण्याची कुवत नाही. त्यामुळे 31 मार्चनंतर काही काळ मुदत वाढ देण्याची गरज आहे.
– प्रदीप जाधव, व्यावसायिक, निपाणी

Back to top button