कर्नाटक : पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसू पाहणार्‍या तरुणाला अटक | पुढारी

कर्नाटक : पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसू पाहणार्‍या तरुणाला अटक

दावणगिरी; वृत्तसंस्था : दावणगिरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात घुसू पाहणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाल्याने या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्या तरुणाचीही कसून चौकशी सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी कर्नाटकच्या दौर्‍यावर होते. दावणगिरी येथे पंतप्रधानांचा रोड शो सुरू असताना हा प्रकार घडला. मोदी यांना बघण्यासाठी रस्त्याच्या कडेला सुरक्षा कुंपणापलीकडे गर्दी होती. या गर्दीच्या रेट्यामुळे हा तात्पुरता उभारलेला कठडा पडला व त्यामुळे या तरुणाने थेट मोदी यांच्या ताफ्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र, त्याला पाहून एसपीजी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस अधिकारी आलोक कुमार यांनी सांगितले की, या तरुणाचे नाव बसवराज कटगी असून, तो कोप्पल जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो फक्त मोदींना बघण्यासाठी दावणगिरी येथे आला होता. त्याला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button