बंगळूर : डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

बंगळूर : डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : जेथे विजय संकल्प यात्रा निघाली आहे, तिथे भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे ही यात्रा म्हणजे भाजपचा विजयोत्सव आहे. राज्यातील जनता भाजपला सत्तेत आणण्यासाठी सज्ज झाली आहे. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून बंगळूरमध्ये मेट्रो, तुमकूरमध्ये हेलिकॉप्टर कंपनी, शिमोगा येथे विमानतळ, हुबळी येथे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, राज्यासाठी जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करून गरीब, शोषित आणि वंचितांच्या समृद्धीसाठी झटण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या भाजपच्या विजय संकल्प यात्रेचा समारोप दावणगेरीत झाला. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी आदी उपस्थित होते.

यानिमित्ताने दावणगेरीमध्ये मोदीमय वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. संगोळ्ळी रायण्णा सर्कल ते जीएमआयटी कॉलेजपर्यंत सर्वत्र भगवे आणि भाजपचे झेंडे फडकवण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनी कन्नडमध्ये भाषण सुरू केले. यावेळी त्यांनी डबल इंजिन सरकारच्या योजनांबद्दल माहिती देऊन काँग्रेस नेत्यांवर
हल्ला चढवला. कर्नाटकात आपल्याला सहकार्याचे सरकार लाभले आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास कर्नाटकाचा विकास आणखी खुंटणार आहे. राज्यात भाजप सरकारच बहुमताने येणार असून कर्नाटकात विकासकामे प्रगतीपथावर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Back to top button