बेळगाव : मयत व्यक्तीला जिवंत दाखवून जमीन विक्रीचा प्रकार | पुढारी

बेळगाव : मयत व्यक्तीला जिवंत दाखवून जमीन विक्रीचा प्रकार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मयत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवून जमीन विक्रीचा प्रकार केदनूर येथे घडला आहे. हा प्रकार उपनोंदणी कार्यालयामध्ये उघडकीस आला. कडोली शिवारातील जमिनीचा मालक मयत झाला असताना तो जिवंत आहे, असे दाखवून जमीन खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. खरेदीदारासह विक्री करणार्‍या आणि साक्ष राहणार्‍या सात जणांवर मार्केट पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधितांना तातडीने अटक करून सातबारा उतार्‍यावरील त्यांची नावे कमी करावीत, या मागणीचे निवेदन केदनूर येथील शेतकर्‍यांनी अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला यांना दिले. केदनूर येथील मयत नेमाणी आप्पया कणबरकर आणि हुवाप्पा आप्पया कणबरकर यांची कडोली हद्दीमध्ये जमीन आहे. त्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आली. नेमाणी कणबरकर हे 10 मे 2020 रोजी मयत झाले आहेत. तर हुवाप्पा हे आजारी असल्याने घरातच असतात. मात्र, उपनोंदणी कार्यालयात या दोघांची बनावट सही व फोटो लावून जमीन खरेदी केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जमीन विकणारे कल्लाप्पा भेरू कणबरकर, पुंडलिक भैरू कणबरकर हे दोघेही राहणार केदनूर, जमीन खरेदी करणारे संगीता सुरेश चौगुले, लक्ष्मी संतोष कुट्रे, विलास चौगुले आणि खरेदी करताना साक्षी राहणारे ओमकार जाधव यांच्यासह आणखी एकावर मार्केट पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भा. दं. वि. 420, 465, 467, 468, 471, 461 सह कलम 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून बरेच दिवस उलटले तरी त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यावेळी गंगा नेमाणी कणबरकर, प्रशांत नेमाणी कणबरकर, जोतिबा कणबरकर, रामा कणबरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Back to top button