बेळगाव : निपाणीत दुचाकी चोरांना अटक | पुढारी

बेळगाव : निपाणीत दुचाकी चोरांना अटक

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चोरायच्या आणी त्या रस्त्यालगतच माती अथवा मुरूमासाठी खोदलेल्या खड्ड्यात लपवून ठेवायच्या आणि ग्राहक शोधून विकायच्या असा चोरीचा अनोखा फंडा वापरणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना निपाणी शहर पोलिसांनी रविवारी गजाआड केले. लक्ष्मण विरूपाक्ष कणबर्गी (वय 28) रा.अंकलगी ता. गोकाक व आप्पाजी श्रीकांत राजापगोळ (वय 23) रा. बनीबाग ता. हुक्केरी अशी अटक केलेल्या दोघा संशयतांची नावे आहेत. यावेळी संशयीत दोघांकडून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या 16 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या 23 दुचाकी जप्त केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दि.14 रोजी येथील हॉटेल व्यवसायिक सुनील चंद्रकांत सांगावकर (रा. प्रगतीनगर), निपाणी यांची दारात लावलेली दुचाकी मध्यरात्री चोरीस गेली होती.त्यानुसार सुनील यांनी शहर पोलिसात याबाबतची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या दुचाकीचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालवला होता.दरम्यान दि. 17 रोजी शहराबाहेरील शिरगुपी क्रॉस येथे संशयित लक्ष्मण व आप्पाजी हे दोघे दुचाकी ढकलत जात असताना गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने दोघांनाही थांबवुन विचारणा केली. यावेळी दोघांनीही आपल्या सोबत असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली.
त्यानुसार दोघांची कसून चौकशी केली असता,त्यांनी आपण या दुचाकीसह अन्य 22 दुचाकी या धारवाड, बेळगाव ,मारिहाळ, बैलहोंगल संकेश्वर,निपाणी येथून चोरून त्या लपवून ठेवल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी अंकलगी येथे जाऊन संशयित दोघांनी चोरलेल्या दुचाकी झाडांच्या आडोशाला असलेल्या खड्ड्यात लपविल्याचे दिसून आले. त्यानुसार सर्व दुचाकी जप्त करून त्याची खातरजमा केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.संजीव पाटील,अतिरिक्त जि.पो. प्रमुख एम.वेणूगोपाल,डीएसपी बसवराज यलीगार,सीपीआय एस.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पुजारी यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक एम.जी.मुजावर हवालदार राजू दिवटे,पारीश घस्ती, सुदर्शन अस्की,गजानन भोई, सलीम मुल्ला,एम.जी.कलावंत यांनी केली.

विशेष म्हणजे गतवर्षी निपाणी ग्रामीण पोलिसांनी अशाच प्रकारे चौघा संशयीताकडुन 45 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या होत्या.सलग दुसऱ्या वर्षी निपाणी पोलिसांकडून ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले.दरम्यान संशयित लक्ष्मण व आप्पाजी या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना निपाणी न्यायालयापुढे हजर केल्याची माहिती उपनिरीक्षक पुजारी यांनी दिली.

हेही वाचलंत का?

 

Back to top button