बंगळूर : सिद्धरामय्या यांच्या मतदारसंघावरून गोंधळ

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली असतानाच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या मतदारसंघाच्या निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी सिद्धरामय्या यांनी कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते; पण तेथे विजयाच्या शक्यतांबाबत साशंकता असल्यामुळे हायकमांडनेच सुरक्षित क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन मतदारसंघांत त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी चामुंडेश्वरीत त्यांचा पराजय झाला, तर बदामीत त्यांनी विजय संपादन केला. यावेळी सिद्धरामय्या यांनी बदामीमध्ये माजी मंत्री बी. बी. चिम्मनकट्टी यांच्यासह अनेक स्थानिक नेते इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागणार आहे.
ते कोलारमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पण, काँग्रेसने केलेल्या दोन सर्वेक्षणानुसार कोलार हा सिद्धरामय्या यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ नाही. या संदर्भात शुक्रवारी (दि. 17) दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना सुरक्षित मतदारसंघ निवडा किंवा यावेळी निवडणूक न लढवता माघार घ्या, असा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिद्धरामय्या पुन्हा वरुणमधून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस सत्तेवर आली पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार टक्कर आहे.