मलप्रभेचे पाणी हुबळी-धारवाडला सोडणार : पंतप्रधान मोदी

धारवाड; पुढारी वृत्तसेवा : आयआयटीमुळे धारवाडचे नाव जगभरात पोहचणार आहे. यामुळे प्रत्येकाला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. अशीच विकासकामे करुन जनतेची सेवा करण्यात येत आहे. भविष्यात राज्य व केेंद्र सरकारच्या सहयोगाने मलप्रभेचे पाणी हुबळी-धारवाडच्या जनतेला मिळवून देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हुबळी-धारवाड येथील नूतन आयआयटीच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचे लोकार्पण करुन पंतप्रधान मोदी बोलत होते. तत्पूर्वी मंड्या येथे विविध विकासकामांचे करण्यात आले. 8479 कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर-म्हैसूर एक्स्प्रेस महामार्गाचे लोकार्पण करुन मोदींनी जाहीर सभा घेतली.
धारवाड हे कर्नाटकाचे सांस्कृतिक केंद्र आहे. साहित्यिक द. रा. बेंद्रे, पंडित भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल, पंडित कुमार गंधर्व अशा महान रत्नांनी या शहराला मोठे नाव मिळवून दिले आहे. वेगवेगळ्या विकासकामानिमित्त कर्नाटकचा दौरा अनेकवेळा करावा लागला आहे. त्याप्रमाणे येथील जनतेने भरभरुन प्रेम व आदर देऊन स्वागत केले आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या जनतेचा मी ऋणी आहे. हे ऋण आपण या जनतेची सेवा करुन फेडणार आहे, असे मोदींनी सांगितले.
कर्नाटकच्या गतिमान विकासासाठी डबल इंजीन सरकारची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी मंड्या येथील कार्यक्रमात सांगितले. बंगळूर व म्हैसूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या महामार्गाचे लोकार्पण हा ऐतिहासिक क्षण आहे. बंगळूर हे आयटी तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. तर म्हैसूर हे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहेे. त्यामुळे हा महामार्ग केवळ दोन शहरांना जोडणार नाही तर अनेक विकासकामाना चालना देणारा मार्ग आहे. कृष्णराज वडेयर व सर एम. विश्वेश्वरय्या या दोन महापुरुषांच्या प्रेरणेतून हे कार्य घडले आहे. या महापुरुषांनी पायाभूत सुविधांचे महत्त्व काय आहे, हे दाखवून दिले आहे. यासाठी भाजप सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे.
संपूर्ण जग कोरोना संकटात असतानाही देशात विकासाची गती मंदावलेली नाही. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने 10 लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या महामार्गामुळे या भागातील उद्योगांना चालना मिळणार आहे. वाहतून कोंडीच्या समस्येमुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या समस्या कायमस्वरुपी दूर करण्यात आल्या आहेत. भारतमाला, सागरमाला योजनांच्या माध्यमातून कर्नाटकाचा विकास साधण्यात येत आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मंगळूर-बंगळूर संपर्क रस्ता बंद होत होता. ही समस्या आता राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
काँग्रेस सरकारला गरिबांच्या दु:खाची जाणीव नव्हती. विकासाच्या नावावर त्यांनी हजारो कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप मोदींनी केला. 2014 मध्ये जनतेने आशीर्वाद देऊन गरिबांचे सरकार आणले आहे. त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करत आहे. उज्ज्वला योजना, वीज, रस्ते, आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले आहे. सरकारी योजना गरिबांच्या दरवाजात पोहोचविल्या आहेत. मात्र काँग्रेसने सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरिबांना सरकारी कार्यालयांच्या फेर्या मारण्यास भाग पाडले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी काँग्रेस सरकारच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला.
इथेनॉल उत्पादनातून ऊस उत्पादकांना दिलासा
साखरेचा जिल्हा म्हणून मंड्याला ओळखले जाते. उसाचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने इथेनॉल धोरण अवलंबले आहे. यासाठी साखर कारखान्यांकडून उत्पादित होणारे इथेनॉल खरेदी करुन साखर कारखान्यांसह शेतकर्यांना दिलासा दिला आहे. कारखान्यांनी 20 हजार कोटीचे इथेनॉलची तेल कंपन्यांना विक्री केली आहे. यामुळे कारखान्यांना शेतकर्यांचे उसाचे बिल देणे सोयीचे झाले आहे. सहकारी साखर कारखान्यांसाठी 10 हजार कोटींची निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच करामध्ये सवलत देण्यात आली आहे. या माध्यमातून ऊस उत्पादकांचा विकास साधण्यात येत असल्याचे पंतप्रदान मोदी यांनी सांगतिले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. अपक्ष खा. सुमलता अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन राजकीय वतुळातील चर्चेला विराम दिला.