बेळगावात मनपा कामकाजाचे कानडीकरण | पुढारी

बेळगावात मनपा कामकाजाचे कानडीकरण

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  लोकनियुक्त सभागृह स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची सोमवारी बैठक झाली; पण या बैठकीत महापौर, नगरसेवक, आमदार आणि अधिकारीही केवळ कन्नडमध्येच चर्चा करत होते. सभागृहात बहुसंख्य मराठी नगरसेवक असूनही मराठीतून बोलणे टाळले. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी सभागृहातून हद्दपार झाल्याची चर्चा दिसून आली.

महापालिका सभागृहात सोमवरी अर्थसंकल्पपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नगरसेवकांकडून अर्थसंकल्पाबाबत सल्ले मागवण्यात आले. एकीकडे, मराठी महापौर झाल्याचे समाधान शहरात व्यक्त होत असताना मात्र महापौर शोभा सोमणाचे यांनी आपल्या लिखित भाषणाची सुरुवात कन्नडमधूनच केली. त्यानंतर आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, नगरसेवक राजशेखर डोनी, शंकर पाटील, संदीप जिरग्याळ यांनी कन्नडमधूनच विविध समस्या मांडल्या.

महापालिका सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे सत्ता असताना मराठी प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक मराठीतून भाषण करत होते. कन्नड प्रभागातील नगरसेवक कन्नडमधून आणि उर्दू नगरसेवक उर्दूमधून भाषण करत होते. महापौर सर्वांना मराठीतून उत्तरे देत होते. अधिकारीही मराठीतून माहिती सांगत होते; पण, आता ही प्रथा मागे पडली असून, सभागृहातूनच मराठी हद्दपार झाल्याचे चित्र दिसून आले.

बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मराठीतून मुद्दा उपस्थित केला, तर भाजपचे गिरीश धोंगडे आणि नितीन जाधव हेसुद्धा मराठीतून बोलले; पण दोन्ही आमदार आणि इतर नगरसेवकांनी मात्र कन्नडमधून आपले म्हणणे मांडले.

नगरसेवक मोदगेकरांचे कानडी प्रेम

बैठकीत अपक्ष नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनीही कन्नडमध्ये मनोगत व्यक्त केले. मोदगेकर हे बसवण कुडची येथील प्रभागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता; पण सभागृहाच्या पहिल्याच बैठकीत त्यांचे कन्नड प्रेम उफाळून आल्याचे दिसून आले.

Back to top button