बेळगावात बारावी परीक्षेसाठी जमावबंदीचा आदेश; परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर | पुढारी

बेळगावात बारावी परीक्षेसाठी जमावबंदीचा आदेश; परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : येत्या गुरुवारी ९ मार्चपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात ५ किंवा त्याहून अधिक लोकांनी फिरकू नये, यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जमावबंदीचा आदेश बजावला आहे. जिल्ह्यासह राज्यभरात गुरूवारपासून बारावीच्या अंतिम परीक्षेला प्रारंभ होणार आहे. परीक्षा काळात केंद्रात तसेच केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश बजावला आहे.

विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणी आजूबाजूला फिरत असेल, ५ किंवा त्याहून अधिक लोक एकत्रित जमत असतील तर अशांना तेथून हाकलून लावण्याचे आदेशात नमूद आहे. अंत्ययात्रा वगळता परीक्षा केंद्र परिसरातील रस्त्यावरून कसलीही मिरवणूक, परिसरात सार्वजनिक सभा घेण्याची नाही, शिवाय या रस्त्यावरून स्फोटक पदार्थ अथवा शस्त्रास्त्रे घेऊन जाणे, फटाके फोडणे, सरकारी बसेस व परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या स्टाफसाठी अडवणूक होईल, असे कृत्य करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रापासून २०० मीटरपर्यंत कुठेही झेरॉक्स सेंटर सुरू असू नये, विद्यार्थी, शाळा, कॉलेजचा स्टाफ, सरकारकडून नियुक्त केलेले अधिकारी व परीक्षा केंद्रांवर नियुक्ती केलेल्या पोलिसांव्यतिरिक्त कोणालाही आत सोडले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिसरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचा आदेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे. राज्यात ९ मार्चपासून बारावी तर २९ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षण खात्याने तयारी सुरू केली असून मुख्य पर्यवेक्षकांना परीक्षेसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २५ हजार ३९० विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये २ हजार ८२० विद्यार्थी रिपीटर तर १ हजार १०५ बहिस्थ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून ३३ हजार १९० विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी १२० केंद्रावर परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १२१३ विद्यार्थी रिपीटर आहेत. दहावी व बारावी परीक्षा केंद्रावर पालक किंवा इतर अनोळखी व्यक्तीला परीक्षा केंद्रावर सोडले जाणार नाही, असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट केले आहे. परीक्षा केंद्रांवर १४४ कलम लागू असणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी ११ विभाग तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी भरारी पथक असणार आहे. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी शिक्षण खात्याने अधिक काळजी घेण्याची सूचना केंद्रप्रमुखांना करण्यात आली आहे.

Back to top button