‘बेळगावी’ उल्लेखावर खासदार अमोल कोल्हे यांचा माफीनामा | पुढारी

‘बेळगावी’ उल्लेखावर खासदार अमोल कोल्हे यांचा माफीनामा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली असून अनवधानाने बेळगावी असा उल्लेख केल्याचे मान्य केले. याशिवाय त्यांनी रविवारी राजहंसगडावर काँग्रेसकडून आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

राजहंसगडावर काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. कोल्हे यांना निमंत्रित करण्यात आले होते. बेळगावला येतोय, हे सांगण्यासाठी खा. कोल्हे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओत बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला. त्यावर सीमाभागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर खासदार कोल्हे यांनी दुसरा व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात ते म्हणतात की, बेळगावच्या राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला येत होतो. पण, निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना, घाईत या कार्यक्रमाबद्दल बोलताना बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. याबाबत मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील. त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे. सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहतोय, म्हणून या कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं होतं. यात बेळगावचा माझ्याकडून अनावधानाने, घाईत चुकीचा उल्लेख झाला. आपल्या भावना दुखावल्याबद्दल सर्वांची माफी मागतो. तसेच या कार्यक्रमाला येण्याचे रद्द करतो.

Back to top button