बेळगाव : रेशनचा 18 क्विंटल तांदूळ निपाणीत जप्त | पुढारी

बेळगाव : रेशनचा 18 क्विंटल तांदूळ निपाणीत जप्त

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात चोरून विकणार्‍यावर आहार विभागाने मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. मुबारक वल्लीमहम्मद अझरबी (वय 51, रा. हिदायतनगर, निपाणी) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचा 17 क्विंटल 50 किलो तांदूळ व कार असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी मुबारक रेशनवर विक्री होत असलेला तांदूळ कारमधून खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती तालुका आहार विभागाचे निरीक्षक अभिजित गायकवाड यांना मिळाली. गायकवाड यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती देऊन मुबारकला रंगेहात पकडून मुद्देमाल जप्त करून शहर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. आहार विभागाचे कर्मचारी आकाश घुगरे, जितू पाटील यांच्यासह शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

Back to top button