बेळगाव : पंतप्रधान मोदी हे येत्या सोमवारी बेळगाव दौऱ्यावर  | पुढारी

बेळगाव : पंतप्रधान मोदी हे येत्या सोमवारी बेळगाव दौऱ्यावर 

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बेळगावच्या नव्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्याबरोबरच कृषी विभागातर्फेही काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता अंगडी कॉलेजसमोरच्या मैदानावर सभा होण्याची शक्यता आहे. हेलिपॅडही तिथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

पंतप्रधानांच्या दौर्‍याची माहिती भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर सोमवारी जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन दौर्‍याची तयारी सुरू केली. बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, काही विकास योजनांचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. दौर्‍याचे नियोजन नेटके व्हावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांना दिली. तर पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी बंदोबस्ताच्या तयारीची माहिती दिली.

बैठकीस जिल्हा पंचायतचे मुख्य प्रशासकीय अधिकारी हर्षल भोयर, रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती हरिता, डीसीपी शेखर एसटी, निवासी जिल्हाधिकारी के. टी. शांताला, डीसीपी स्नेहा आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी 27 रोजी शिमोगा दौर्‍यावर आहेत. तेथील सभा आटोपून ते हेलिकॉप्टरने बेळगावला येणार असून, बेळगावात त्यांची सभा होणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते अ‍ॅड. एम. बी. जिरली, खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके, आ. अभय पाटील यांनी दिली. सभेचे स्थळ अजून ठरलेले नाही.

जिल्हा क्रीडांगण, अंगडी कॉलेजचे मैदान, हलग्याजवळचा शिवार आणि सीपीएड मैदान या चार ठिकाणांची पाहणी सुरू असून, काही दिवसांत स्थळ निश्चित केले जाईल, असे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सभेचा आगामी निवडणुकीसाठी कसा उपयोग करून घेणार, असे विचारता अ‍ॅड. जिरली म्हणाले, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांचा रोड शो करायचा का, यावरही विचार चाललेला नाही. सविस्तर दौरा काही दिवसांत जाहीर करू.

Back to top button