सीमाप्रश्नी लवकरच निपाणीत मेळावा : उदय सामंत | पुढारी

सीमाप्रश्नी लवकरच निपाणीत मेळावा : उदय सामंत

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  सीमाभागातील मराठी माणूस हा कोणापुढे झुकणार नाही. ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगणार्‍या या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभा आहे. येथून पुढे दरवर्षी शिवजयंतीदिनी हा रोजगार मेळावा होईलच. शिवाय सीमाप्रश्नी लवकरच निपाणीत सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत मेळावा होईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेज मैदानावर महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व पद्मभूषण देवचंद शाह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर मेळाव्याला सुरुवात झाली.

मंत्री सामंत म्हणाले, सीमाभागातील मुलांना सीमाभागातच रोजगार मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून उद्योग निर्माण करता येतील. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागातील उद्योजकांना महाराष्ट्र सरकारच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सीमाभागातील तरुण हा मराठी असल्यामुळे कर्नाटक सरकार नोकरी देण्यासाठी त्यांच्यावर नेहमीच अन्याय करत आहे. पण, महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. सीमाभागातील तरुणांना रोजगार मिळून तो स्वावलंबी बनावा. या उद्देशाने सीमाभागात प्रथमच भव्य महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.

महाराष्ट्र ही संघर्षाची भूमी आहे. त्यामुळे माझ्याच देशात फिरत असताना सरकारमधील मंत्र्यांनी कोठे जावे आणि कोठे जाऊ नये, हे आम्हाला कोणीही शिकवू नये, असा टोलाही त्यांनी कर्नाटक सरकारचे नाव न घेता लगावला. खा. धैर्यशील माने म्हणाले, देवचंद शाह यांनी सीमाभागात शैक्षणिक संस्था उभारून येथील मराठी भाषिकांना न्याय दिला आहे. मराठी भाषिकांना शिक्षणानंतर नोकरी देऊन थांबवण्याचे स्थैर्य देणे ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. सीमाभागात अशा पद्धतीची शिक्षण संस्था चालवणे ही मोठे जिकिरीचे काम असून ही जबाबदारी आशिषभाई शाह यांनी यशस्वीपणे पेलली आहे. ही संस्था चालवताना त्यांना अनेक अडचणी येतात. मात्र, यापुढील काळात महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे. आज येथे आयोजित या संस्थेच्या माध्यमातून आयोजित मेळव्यातून सीमाभागातील युवकांना अनेक कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. सीमाभागात प्रथमच घेतलेला महारोजगार मेळावा सीमाभागातील तरुणांच्या आयुष्याला विधायक वळण देणारा ठरणार आहे. या माध्यमातून तरूणांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावीत.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांनी या ना त्या मार्गाने महाराष्ट्र सरकारने स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. देवचंद कॉलेजच्या माध्यमातून येथील मराठी भाषिक देशपातळीपर्यंत चमकला आहे. परंतु कर्नाटक सरकारकडून ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याचा विचार करता महाराष्ट्र सरकारने सीमाभागात रोजगार मेळावा घेऊन चांगला न्याय दिला आहे. अशाच पद्धतीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह म्हणाले, महारोजगार मेळाव्यामुळे मराठी भाषिकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. सीमाभागात शैक्षणिक संस्था चालविताना आमच्या तिसर्‍या पिढीने यशस्वी योगदान दिले आहे. अशा पद्धतीने रोजगार मेळावा घेऊन महाराष्ट्र सरकारने आमच्यावरील विश्वास दृढ करून जबाबदारी वाढवली आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही मार्गदर्शन केले. महामेळाव्यात सुमारे 90 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यासाठी 5 हजार जणांनी नोंदणी केली होती. विविध कंपन्यांमध्ये 50 विद्यार्थ्यांची थेट निवड झाली. त्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मंजुरी नियुक्ती पत्राचे वाटप तसेच विविध बँकांकडून आर्थिक सहाय्य मंजूर झालेल्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्राचे उपसंचालक सदाशिव सुरवसे, अनिल शिंदे, किरण राहणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, हातकणंगले जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जनता शिक्षण मंडळाचे खजिनदार सुबोधभाई शाह, उपाध्यक्ष तृप्ती शाह, म. ए. युवा समिती नेते शुभम शेळके, अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, विकास कलघटगी, निपाणी म. ए. युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, सरचिटणीस अमोल शेळके, जयराम मिरजकर, प्रा. डॉ. अच्युत माने, दीपक पाटील, अजित पाटील, नानासाहेब पाटील, दिनकर पाटील, सुनील किरळे, राजकुमार मेस्त्री,विनोद आंबोवकर आदी उपस्थित होते. देवचंद कॉलेज व मोहनलाल दोशी विद्यालयातील एनसीसी व व्हाईट आर्मीच्या विद्यार्थ्यांनीही मेळाव्यासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन सागर माने यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राचा नारा

रविवारी पार पडलेला रोजगार महामेळावा हा मराठी भाषिकांसाठी असला तरी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर झाला. त्यामुळे कोल्हापूर व बेळगाव येथील दोन्ही पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त होता. या मेळाव्याला उपस्थित मराठी भाषिकांनी बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Back to top button